“शक्तीपीठ विरोधी आंदोलन, कळण्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना???
Adv. Nakul Parsekar
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कितीही विरोध झाला तरी त्यांचा स्वप्नवत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कंबर कसलेली आहे. राज्य मंञिमंडळाने त्याला मान्यता दिलेली असून तब्बल वीस हजार कोटींची तरतूदही केलेली आहे. समृद्धी मार्गामुळे अनेकांना समृद्धी आली आता शक्तीपीठ मार्गामुळे कोण कोण गब्बर होणार हे नजिकच्या काळात समजेल. राज्यातील प्रमुख शक्तीपीठाना जोडणाऱ्या या मार्गामुळे आध्यात्मिक पर्यटनाला जोरदार चालना मिळेल असा सरकारचा दावा. तर या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची हजारो एकर सुपीक जमीन जाणार आहे त्यामुळे शेतकरी उध्वस्त होतील आणि पर्यावरणाची अपरिमित हानी होणार, हा विरोधकांचा आक्षेप. कोल्हापूर, सोलापूर येथील काही शेतकऱ्यांनी व विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी विरोधाचा सुर आळवला, पण या विरोधाला फडणवीस भिक घालणार नाही हे आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्याने स्पष्ट आहे.
या प्रकल्पात सावंतवाडी व पर्यावरण द्रुष्टीने संवेदनशील असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील बाराहून जास्त गावे बाधित होणार आहेत. याला विरोध करण्यासाठी संबंधित भागातील शेतकरी व विरोधक आंदोलन करणार आहेत. यावरून मला काही वर्षापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावातील मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्यावेळी या आंदोलनाचा मी सुद्धा एक भाग होतो. तेव्हा मायनिंग विरोधात ” औष्णिक, मायनिंग, सेझ चलेजाव फोरमची स्थापना केली होती. ज्या फोरमचे लेटरहेड सापडले. या फोरमचे निमंञक होते समाजवादी नेते स्व. प्रा. गोपाळ दुखंडे,जेष्ठ पञकार कुमार कदम, त्या आंदोलना नंतर बहुजन समाज पक्षातून लोकसभेची निवडणूक लढवलेले आणि ठाकरे सेनेचे विद्यमान प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर आणि चौथा निमंत्रक मी स्वतः होतो. या फोरमचे सदस्य होते माजी खासदार सुधीर सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, श्री अजित गोगटे, श्री परशुराम उपरकर,श्री संदेश पारकर, माजी आमदार सर्वश्री शिवराम दळवी, श्री प्रमोद जठार, स्व. महेंद्र नाटेकर, श्री मोहन केळुस्कर, माजी आमदार वैभव नाईक, श्री अमीत सामंत, अण्णा केसरकर, संजय भोगटे,बाळ कनयाळकर आणि शिवाजी सावंत.
एवढा विरोध करुनही अगदी सगळ्यांच्या नाकावर टिच्चून कळण्याचे आंदोलन चिरडून टाकले. एकाचा दुर्दैवी बळी गेला ज्यामध्ये नाहक सच्चे संघ स्वयंसेवक असलेले व शिक्षक असलेले घोटगे सर, तुषार सापळे वैगेरेना तुरुंगवास भोगावा लागला. सुरूवातीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाणारे सगळे विखुरले गेले. काही जणांनी तर आपल्या निवडणूक निधीची व्यवस्था केली. मात्र सच्चे समाजवादी स्व. गोपाळ दुखंडे सारख्यानी माझ्या सारख्याना बरोबर घेऊन खिंड लढवली. पण सत्तेपुढे शहाणपणा नसतो. नागमोडी वळणातून लालपरी त्या रस्त्यावरून जायला लागली की लक्ष वेधून घेणारा कळण्याचा सुंदर डोंगर नेस्तनाबूत झाला.. बोडका झाला. मायनिंग दलालांनी हात धुऊन घेतले. मायनिंग वहातूक करणाऱ्या भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरखाली चिरडून काही जणांचा जीव गेला ज्यामध्ये दुर्दैवाने माझ्या सख्या बहीणीच्या यजमानांचा समावेश होता.
आता सिंधुदुर्गात हा शक्तीपीठ विरोधी लढा सुरू होईल. आंदोलन होतील. महायुती सरकारकडे पाशवी बहुमत आहे. सत्तेच्या जोरावर आंदोलन चिरडून टाकले जाईल आणि आमच्या दुर्दैवाने पुन्हा एकदा कळण्याची पुनरावृत्ती होईल. आपण आशा करुया की या आंदोलनात स्वच्छ हेतू ठेवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा लढा एका योग्य मार्गाने लढला जाईल, त्यासाठी शुभेच्छा!