मुंबई :
अगोदरच कोरोनाने नोकर्या, कामधंदा हिरावून घेतल्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण होऊन बसले असतानाच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खाद्य तेलाच्या व बेसनाच्या वाढत्या किमतीने मुंबईतील रस्त्यावरील हातगाडी, टपर्यांवर मिळणारा वडापाव, भजीपावदेखील महागला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांना वडापाव खाऊन एक वेळेची गुजराण करणे देखील कठीण झाले आहे.
मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या वडापावाचा भाव आता वाढला आहे. बेसन पीठ, खाद्य तेल, बटाटे, इंधन आदींचे दर वाढल्याने या किमती वाढल्या आहेत. गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता चक्क 15 रुपयांवर पोहोचला आहे.
तेलाच्या किमतीने केलेली 100 पार व चणाडाळीच्या दरांत झालेल्या वाढीमुळे डाळीचे पीठ महागले असून त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरही झाल्याचे सातबंगला वटेश्वर मंदिर येथील वडापाव विक्रेते श्रीराम (संदीप) शेंद्रे यांनी सांगितले. शिवाय सतत वाढणारे सिलिंडरचे दर, कामगारांचा वाढणारा पगार व इतर अनेक कारणांमुळे वडापावचे दर तीन ते पाच रुपयांनी वाढवण्यात आले असल्याचे शेंद्रे यांनी सांगितले.
हरभर्याचे पीक मार्च – एप्रिल दरम्यान येथे. त्यामुळे चना डाळीचा दरही वाढत असल्याने याचा परिणाम बेसनावर झाला असून बेसनाचे दर नव्वदी ओलांडू पहात आहेत. गेल्या दोन महिन्यांत चण्याच्या डाळीच्या किमती वाढल्या असून 70 रुपये किलो मिळणारी डाळ आता 90-100 रुपये किलो अशी विकली जात आहे. दिवाळीतील फराळाला या दरांचा चांगलाच चटका बसला आहे. आता वडापावच्या दरांवरही डाळीच्या महागाईचे पडसाद दिसू लागले आहेत.
चणाडाळीसोबत डाळीचे पीठही महागल्याने विक्रेत्यांनी वडापावच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. साध्या गाडीवर 12 रुपयांना मिळणारा वडापाव 15 रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबतच भजीच्या प्लेटचे दरही 4 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. शिवाय मुुंबईतील प्रसिद्ध जम्बो किंगमध्ये वडापावचे दर आता 18 रुपये प्रतिनग करण्यात आले आहे. तर बिकानेर स्वीट, ठक्कर स्वीट अशा मोठ्या व्यावसायिकांनी वडापाव चे दर 20 रुपये केले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून चण्याच्या पिठाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे सध्याच्या दरांत वडापाव विकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे वडापावचा दर 12 रुपयांवरून 15 रुपये करण्यात आला आहे, असे प्रार्थना समाज मार्केटजवळील नामांकित शिववडा पावचे मालक अरुण गडदे यांनी सांगितले.
दादर स्थानकाजवळील जम्बो किंग या वडापावच्या शाखेत 15 रुपयांचा भजीपाव 18 रुपयांनी विकला जात आहे. वडापावची कायम मागणी असते, मात्र डाळीच्या किमती वाढल्यामुळे व्यवसाय करणे परवडत नसल्याचे या दुकानाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
तेलाच्या दरात दिवाळीनंतर साधारणपणे तीस टक्के दरवाढ झाली आहे. तर बेसनाच्या दरात 15 टक्के दरवाढ झाली असल्याने खाद्यपदार्थांच्या दरात वाढ ही अटळ होती. परंतु या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत असताना सरकारने या दरवाढीला अंकुश लावावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.