You are currently viewing महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम; दर महिन्याला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा 

महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम; दर महिन्याला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

 

महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मोठ्या संख्येने उत्तीर्ण कराव्यात यासाठी विविध स्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच एक चांगला प्रयत्न अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी येत्या एक जुलैपासून सुरू केलेला आहे. श्री आशिष येरेकर हे नुकतेच अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत. आल्या आल्या त्यांनी स्पर्धा परीक्षेतील अमरावतीचे वातावरण पाहून दर महिन्याच्या एक तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचे निश्चित केले आहे. त्या उपक्रमातील पहिली विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा अमरावती येथे एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न होणार आहे.

या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे उद्घाटन अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल ह्या करणार असून या कार्यक्रमाला स्वतः जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र तसेच अमरावती महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त सनदी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना निमंत्रित केले आहे .त्याचबरोबर यावर्षी आयएएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले धामणगाव रेल्वेचे सुपुत्र श्री रजत पत्रे तसेच वरुडच्या सुकन्या कुमारी नम्रता ठाकरे अनिल कुमार खंडेलवाल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे सर्व उच्चपदस्थ अधिकारी तसेच नव्याने आयएएस झालेले विद्यार्थी या विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्याचा पायंडा सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी डा.श्री श्रीकर परदेशी यांनी नांदेड येथे असताना सुरू केला. दर महिन्याच्या पाच तारखेला नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये नियमितपणे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अमरावती अकोला चंद्रपूर या ठिकाणी देखील हा उपक्रम सुरू झाला. मध्यंतरी या उपक्रमामध्ये खंड पडला. पण नांदेडचे सुपुत्र असलेले श्री आशिष येरेकर यांनी हा उपक्रम नव्याने सुरू करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नवे दालन उपलब्ध करून दिलेले आहे .त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल.

श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये काही वर्षांपूर्वी मी अशीच एक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली होती. बहुतेक ते 2008 चे वर्ष असावे. त्यावर्षी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर आयपीएस अधिकारी श्री निलेश भरणे आयपीएस अधिकारी श्री शशांक देशपांडे हे देखील आले होते. या कार्यशाळेमध्ये एका सातव्या वर्गातल्या मुलीने भाग घेतला होता. तिचे नाव पल्लवी चिंचखेडे. ती मुलगी अमरावतीच्या बिच्छू टेकडी चपराचीपुरा ह्या स्लम एरिया मध्ये राहत होती. पण श्री तुकाराम मुंढे यांचे भाषण ऐकून तिला प्रेरणा मिळाली व ती आज सनदी अधिकारी म्हणून दिल्लीला कार्यरत आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात त्यांचा उत्साह वाढवतात .त्यांच्यातील नैराश्य दूर करतात.

या कार्यशाळेमध्ये ज्या दोन विद्यार्थ्यांच्या सत्कार होणार आहे त्यांची आयएएस होण्याची गोष्ट इतरांपेक्षा वेगळी आहे. धामणगाव रेल्वे येथे असलेले श्री रजत पत्रे हे दोन वर्षांपूर्वीच आयएएस झाले असते. पण त्यांनी फॉर्म भरताना दाढी असलेला फोटो लावलेला होता .प्रत्यक्षात मुलाखतीला जाताना मात्र ते दाढी करून गेले. त्यामुळे फॉर्म भरलेला व प्रत्यक्षात असलेला मुलगा एकच आहे का याची शहनिशा करण्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यामुळे रजतची त्यावर्षीची आयएएसची वारी वाया गेली. रजतचे वैशिष्ट्य म्हणजे रजतच्या वडिलांनी तो पोटात असताना त्याच्या आईला आपल्या मुलाला आय ए एस करायचे आहे असे संकेत दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी बालवाडीपासून त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. दहावी आणि बारावीला त्यांनी त्याला पुण्याला पाठवले. रजतने चक्क कला शाखा घेतली आणि कला शाखेतून पदवी केली. पण त्याचे ध्येय ठरले होते. ते म्हणजे आयएएस. या ध्येयाप्रमाणे तो काम करीत राहिला. अगदी अल्पवयामध्ये तो कलेक्टर झालेला आहे. परवा धामणगावला त्याची विजयी मिरवणूक निघाली. ती चार तास चालली. धामणगाव सारख्या छोट्याशा गावातून रजतने हे जे यश गाठले आहे हे निश्चितच नोंद करण्यासारखे आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुरणा येथे राहणाऱ्या नम्रताची गोष्ट आगळी वेगळी आहे. केवळ अपघाताने की आय ए एस झाली असेच म्हणावे लागेल. ती आय ए एस ची तयारी करीत होती. पण यश प्राप्त होत नव्हते. वडील म्हणाले आयएएस चा पिच्छा सोड. एम पी एस सी ला बैस. तिने वडिलांची आज्ञा पाळली. आय ए एस व एम पी एस सी या दोन्हीही परीक्षेचा फॉर्म भरला .एम पी एस सी ची परीक्षा अगोदर होती .पण काही कारणामुळे ती परीक्षा लांबणीवर पडली .त्यामुळे तिने आय ए एस ची परीक्षा दिली .तीन वेळा आय ए एस.ची परीक्षा दिल्यामुळे तिचा अभ्यास झालाच होता .शेवटच्या काही दिवसांमुळे तिने रिविजन करून हे यश संपादन केले आहे. या दोन्हीही विद्यार्थ्यांचे मनोगत त्यांच्या तोंडून ऐकण्यात वेगळा आनंद आहे

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी भरपूर पैसे पाहिजेत कोचिंग पाहिजे इंग्रजी चांगली असली पाहिजे दिल्लीला गेले पाहिजे पुण्याला गेले पाहिजे असे अनेक गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनात असतात. पण अमरावतीचा क्षितीज गुरुभेले नावाचा मुलगा यशोदा नगरात राहतो. भाड्याच्या घरात राहतो. परंतु कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता तो गतवर्षी आयएएस झालेला आहे. विशेष म्हणजे त्याला जी रँक मिळाली आहे त्यानुसार भवितव्यात तो भारताचा कॅबिनेट सेक्रेटरी झालेला असेल.

श्री आशिष येरेकर हे उपक्रमशील आय ए एस अधिकारी आहेत. यापूर्वी ते गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसाठी नीट जेडबलइ यासाठी नांदेडवरून या विषयातील तज्ञ लोकांना प्रशिक्षकांना बोलावून आदिवासी विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून दिली. आणि आता अमरावतीला आल्या आल्या त्यांनी हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. ही केवळ सुरुवात आहे. खरं म्हणजे अशा प्रकारचे अभिनव उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात जर सुरू झाले तर महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले पाठबळ मिळेल तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेमध्ये मराठी टक्का निश्चितच वाढेल आणि म्हणून आशिष येरेकर यांनी आयोजित केलेला हा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे .या चांगल्या उपक्रमाबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा