*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*आषाढस्य प्रथम दिवसे–*
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ॥
कालीदासाने वाङ्मयाचा अमर सिद्धांत सांगून ठेवला आहे की, ‘भाषेची पार्वती नि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यावाचून चिरंतन साहित्य मुळी निर्माणच होत नाही!’
त्याला स्वत:ला कालिमाते कडून मिळालेले वरदान त्याने अक्षरश: खरे केले. हिच प्रचिती त्यांच्या अक्षरवाङमयात द्दगोचर झाली.जवळजवळ दोन हजार वर्षे झाली तरी महाकवी कालिदासाचे काव्य आणि नाट्य आजही कालानुरूप व ताजेतवाने वाटते. हे अभिजात वाङ्मय सर्वकालिक आहे. अभिजातचा अर्थच आहे की जो मरत नाही.या कलाकृती आजही अजरामर आहेत.
कालीदासाच्या तोडीचे अजून कोणतेही कवी निर्माण झाले नाहीत. कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे.
भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की, मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की, जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी ओळ प्रसंगानुरूप आपोआप बाहेर पडतेच. उदा :-
‘मरणं प्रकृति: शरीराणाम्। ‘भिन्नरुचीर्हि लोका:’, ‘एकोहि दोषो गुणसंनिपाते’, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’, ‘परदु:खं शीतलं’, ‘कामी स्वतां पश्यति’, ‘अति स्नेह: पापशंकी’,वगैरे
“गृहिणी सचिव: सखीमिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ।’” विवाहित स्त्रीचे एवढे
वास्तववादी आणि काव्यमय वर्णन कुठेच आढळत नाही.
मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते. त्या सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने, चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. पण त्याला व्यक्त होता येत नाही. कारण त्या भावना योग्य शब्दात व्यक्त करायला लगणारी द्दष्टी व शब्दसंपत्ती तोकडी पडते.
निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते, त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठेही आढळत नाही.
असो आज *आषाढ शुद्ध प्रतिपदा* हा दिवस *कालिदास दिन* म्हणून ओळखला जातो.
कालिदासाची जन्म तिथि माहित नाही त्यामुळे ‘मेघदूताची’ सुरुवात ज्यावेळी केली आहे तोच त्याचा जन्मदिवस धरला जातो.
त्यामुळे*मेघदूताची* आठवण आज हटकून होते ती या ओळीने.त्याची भुरळ अनेकांना पडली. त्या ओळीचे भाषांतर अनेक विद्वानांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीत केले आहे.
*आषाढस्य प्रथम दिवसे* मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडा -परिणत गज-प्रेक्षणीयं ददर्श*
अनेकांना ही मेघदूताची सुरवात वाटते पण ही दुसऱ्या कडव्यातली तिसरी ओळ आहे.
मेघेन + आश्लिष्ट ( लिप्त / वेढलेला)
सानु — पर्वत शिखर वा उंच पठार
वप्रक्रिडा — बैलांचे वा हत्तींचे ढुशा मारत खेळणे
ददर्श — पाहिला ( दृश् धातु)
(विरह पीडित यक्षाला ) आषाढाच्या पहिल्या दिवशी
पर्वत शिखरांना वेढून टाकणारा मेघ ; क्रिडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्ती प्रमाणे दिसला.ते पाहून यक्षीणीला आपली अवस्था कळावी व तिचेही कुशल समजावे म्हणून यक्ष मेघाला दूत होण्याची विनंती करतो. कोणत्या मार्गाने जा याचे मार्गदर्शनही करतो. मेघाला दूत बनवणे हेच मोठे रूपक आहे.
‘मेघदूत’हे पत्नी विरहात लिहिलेले महाकाव्य. यक्ष, कुबेराला शिवपुजेसाठी फुले आणून देतो. शिव पूजेला शंभर फुलांपैकी एक फुल कमी पडते. म्हणून तो यक्षाकडे बघतो तेव्हा यक्ष त्याला सांगतो की, ते एक फुल मी माझ्या प्रेयसीच्या डोक्यात घातले आहे. तेंव्हा चिडलेला कुबेर त्याला ‘एक वर्ष तुला प्रेयसीचा विरह होईल ‘असा शाप देतो.आणि हीच शापवाणी *मेघदूत* या अमर खंड काव्याची निर्माती ठरली. विरहार्त दोन जीव एकमेकांपासून दूरावतात.
त्या विरहातून जे प्रेम व्यक्त केले आहे. ते प्रेम मेघदूताच्या प्रेमात पाडणारेच आहे. त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी संपूर्ण मेघदूतच वाचायला हवे इतके ते प्रेम काव्य अलौकिक आहे.
(शापवाणी आणि सुंदर काव्य यांचा काहीतरी नातं असावं. रामायण महाकाव्यालाही क्रौंच पक्षाच्या प्रणयी जोडप्याला मारणाऱ्या मी शिकाऱ्याला; वाल्मिकींनी दिलेशी शापवाणीच आधारभूत ठरली.)
हे महाकाव्य कालिदासाने मंदाक्रांता वृत्तात रचलेले आहे. चार ओळींची १११ कडवी यात आहेत.
प्रथम हा यक्ष मेघाला आपल्या प्रियतमेच्या नगरी पर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो.यामध्ये ८ पर्वत ९ प्रदेश आणि १० नद्या यांच्या विहंगम दृश्याचे सुंदर वर्णन कालिदासाने जमिनीवर राहून केले आहे. हे सुंदर भौगोलिक वर्णन मेघदूताचा पहिला भाग *पूर्व मेघ* नावाने ओळखला जातो .
तर *उत्तर मेघ* हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे. आता चार मासच शाप संपायला उरले आहेत. मी कार्तिक मासात येतोच आहे.हा यक्षाचा दिलासा आहे.
मेघादूतात कालिदासाने त्या मेघाला सांगितलेला मार्ग व केलेले वर्णन हे तंतोतंत खरेच आहे का ? ( म्हणजे नागपूरच्या रामगिरी (रामटेक) पर्वतापासून ते हिमालयातील अलकानगरीपर्यंतचा मार्ग )का नुसता कल्पनाविलास आहे.(कारण तेंव्हा नकाशे किंवा आँनलाईन मँप नव्हते.) हे बघण्यासाठी डॉ.सुरेश भावे यांनी तो मार्ग विमानाने व पायी जाऊन पडताळून पाहिला.
तेंव्हा कालिदास भूगोल तर कोळून प्यायला आहे असे वाटावे इतके तंतोतंत वर्णन मेघदूतात केले आहे.तसेच मेघ तिथे पोचेपर्यंत निसर्गाचे ऋतुबदल व त्यामुळे त्या त्या प्रांतात होणाऱ्या सृष्टीतील हवामान बदलांचेही अचुक वर्णन, पर्वत,नद्या,मानवी राहणीमान,पशुपक्षी , वनस्पती, यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यासह करतात की, थक्क व्हायला होते.या सगळ्यामुळे मेघदूताची उंची आणखीनच वाढते.ते वाचून विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणतात, हा फक्त कवी नसून खगोलशास्त्रज्ञ हवामान तज्ञ असावा.
कालिदास हा श्रृंगाररसाचा तर सम्राटच आहे.
स्त्री-पुरुषांच्या अंत:करणातील सूक्ष्म भाव कौशल्याने चित्रित करण्याची त्याची हातोटी डोळ्या समोर प्रसंग उभा करते. श्रृंगाराच्या सर्व प्रांतात संचार करूनही त्यांनी भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत! राजाच्या अंत:पुरापासून तो पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून तो अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत, नानाविध प्रणय पात्रांच्या माध्यमातून कालिदासाच्या प्रतिभेने संचार केलेला आहे.प्रेम, विरह, शृंगार, ताटातूट आणि त्या क्षणांची काल्पनिक अवस्था व मनाची घातलेली समजूत हे मानवी जीवनातील थांबेच आहेत. यातील शब्द वैभव, काव्यातला नाद, लय, निसर्गातील टिपलेल्या प्रतिमा, हे सारेच अचंबित करून सोडणारे आहे.
आधी संस्कृत भाषा इतकी समृद्ध आणि सुंदर आहे पण त्यातील सौंदर्य कालीदासाचे कोणतेही लिखाण वाचताना जास्त प्रत्ययास येते.सखोल अर्थ मनाला जाऊन भिडतो. काव्यनिर्मितीने संस्कृत भाषेतील गोडवा सामान्य रसिकांपर्यंत पोचवण्याचे कार्य कोणी केले असेल तर ते कालिदासाने!
एकदा कवींची गणना करताना, कालिदासाच्या नावाने करांगुली मोजल्यानंतर त्याच्या शेजारच्या बोटासाठी त्याच्या तोडीच्या दुसऱ्या कवीचे नाव काही सापडेना. म्हणून ते बोट ‘अनामिका’ ह्या नावाने ओळखतात. असे म्हणतात.
भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नाही, की जिच्या वाङ्मयाला कालिदासाच्या शेकडो सुभाषितांनी भूषविले नाही.
भारतीय संस्कृतीमध्ये जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे, त्या भारतीय जीवनातील सौंदर्याचा व संस्कृतीचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासाच्या वाङ्मयात आढळतो. वाल्मीकी आणि व्यास यांच्या बरोबरीने कालिदासाचे नाव घेतले जाते. या तीन महाकवींनी प्राचीन भारतीय संस्कृतीची विविध रुपे प्रकट केली आहेत.
म्हणून श्री अरविंद म्हणतात की, वाल्मीकी, व्यास आणि कालिदास यांच्या व्यतिरिक्त भारतामधले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची काहीही हानी होणार नाही.आणि ‘मेघदूत’ किंवा ‘शाकुंतल’ ज्याने वाचले नसेल, तो दुर्भागीच ठरेल.
कालिदासाच्या साधारण चाळीस साहित्य कृतीं मधल्या सात उत्कृष्ट साहित्य कृती अशा१) शांकुतल २) मेघदूत ३) कुमार संभव ४) रघुवंश ५ ) मालविकाग्नीमित्रम् ६ ) विक्रमोर्वशीय ७ ) ऋतुसंहार (संहारचा अर्थ समुह वा एकत्रीकरण)
कालिदासाची योग्यता समजून घ्यायला भारतीय लोक फार कमी पडतो. रसिकांपर्यंत व तरुण पिढीपर्यंत त्याचे सौंदर्य पोचावे अशा दृष्टीने हा समृद्ध खजिना अनेक लेखकांनी त्याची भाषांतरे करून रसिकांसाठी उपलब्ध केला आहे.
प्रतिभा फणसळकर.

