नांदोसच्या जंगलात पुर्ण सडलेल्या मृतादेहाची हाडे सापडली
मालवण पोलीस व फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरु : नेपाळी कामगारांचा मृतदेह असण्याची शक्यता
मालवण
मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात शनिवारी सकाळी पुरुष जातीचा पुर्ण सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मालवण पोलीस व फॉरेन्सिक तपासणी विभागाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून हाडांचे अवशेष ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, या मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून सदर मृतदेह प्रदीप सिंह थापा नामक 21 वर्षीय नेपाळी युवकाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा युवक कट्टा येथे चायनीज सेंटर मध्ये कामाला होता, तो एक महिन्या पासून नव्हता मात्र तो घरी गेला असावा असे त्यांच्या सहकारी यांना वाटले. त्यामुळे बेपत्ता नोंद नव्हती. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदोस येथील जंगलात सकाळी छोट्या वडाच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळून आला. स्थानिक शेतकऱ्यांना हा मृतदेह दिसून आला. शेतकऱ्यांनी इतर ग्रामस्थांना माहिती दिली. याविषयी पोलीसांना माहिती दिल्यावर मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्याठिकाणी दाखल झाले.
पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली. त्याठिकाणी मृतदेहाची केवळ हाडे दिसून आली. ज्याठिकाणी हा मृतदेह सापडला त्याठिकाणच्या झाडाला एक दोरी लटकलेली दिसून आली. तर हाडांच्या बाजूला निळ्या काळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट, पांढऱ्या रंगाची चप्पल, टीशर्ट, मोबाईल, घड्याळ पडलेले दिसून आले. तसेच ओळखपत्र व काही नोटा सापडून आल्या. हा मृतदेह सुमारे ३० दिवसांचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
यावेळी ओरोस येथील फॉरेन्सिक विभागाला देखील पाचारण करण्यात आला. त्यांनी हाडांची पाहणी करून सर्व अवशेष ताब्यात घेतले. तसेच मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक संदीप खाडे, पोलीस प्रकाश मोरे, एस. आय मुल्ला, फॉरेन्सिक टीमचे प्रशांत मागाडे, संतोष सावंत, अमित तेली व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.