You are currently viewing शोले मधील गब्बर सिंह आणि सचिन पिळगावकर

शोले मधील गब्बर सिंह आणि सचिन पिळगावकर

 

सचिन पिळगावकर यांनी “शोले” चित्रपटातील अभिनेता अमजद खान यांच्या बद्दल मध्यंतरी एका मुलाखतीत जे काही वक्तव्य केले, ते वक्तव्य मनाला खटकत आहे. कारण “शोले” चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ, संजीव कुमार यांच्यासारखे दमदार आवाजाचे आणि अभिनयाचे कलाकार असताना अमजद भाईंना सोळा सतरा वर्षाच्या सचिन यांनी संवाद कसा म्हणावा हे सांगणे न पटण्यासारखे आहे. सचिन यांच्या आवाजाची पट्टी पाहिली तर त्यांचा आवाज पातळ व नाजूक आहे. दमदार आवाजात त्यांना मराठी, हिंदी संवाद बोलताना चित्रपटात कुणीही पाहिले नाही. मग अशावेळी सचिन पिळगावकर अमजद भाईंना दमदार आवाज असा काढावा असे सांगू शकत नाहीत.

 

“शोले” चित्रपटाची कथा, पटकथा सलीम-जावेद यांनी लिहिली आहे. एखादा लेखक जेव्हा चित्रपटाचा संवाद लिहितो तेव्हा त्याला त्या संवादांची लांबी, रुंदी, खोली, दमदारपणा याबद्दल सर्व काही माहीत असते. चित्रपट कलाकारांनी संवाद म्हणण्या आधी लेखकाने खूप दा हे संवाद बोललेले असतात. त्यात सलीम-जावेद हे दोन लेखक एकत्र काम करत होते आणि या दोघांनी अमजद भाईंना चित्रपटात घेण्यासाठी आग्रह केला होता. म्हणजे हे दोघे अमजद भाईंना संवादाविषयी सांगणार हे निश्चित आहे. दुसरी गोष्ट ही की अमिताभ साहेबांना धर्मेंद्र यांच्या सांगण्यावरून दिग्दर्शकांनी निवडले होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी गब्बर सिंहच्या रोलसाठी डॅनी यांना घ्या असे सांगितले होते. आधी सुरू असलेल्या एका चित्रपट शूटिंगमुळे डॅनी “शोले” चित्रपटात आले नाहीत. त्यावेळी “शोले” मध्ये अमजद भाई आले होते. नाटकात काम केलेला हा अमजद भाई सर्व गुणसंपन्न असणार यात वाद नाही. नाटकातले सर्व कलाकार आवाजाची पट्टी वाढवत असतात त्याशिवाय थेटरच्या रंगमंचावर अभिनेता चालत नाही.

 

कदाचित पहिला चित्रपट असल्यामुळे अमजत भाईंना थोडा वेळ लागला असेल पण याचा अर्थ सचिन यांनी अमजद भाईंना शिकवावे, इतके सचिन मोठे नव्हते जरी ते बालकलाकार म्हणून गाजले असले तरीही. एकीकडे धर्मेंद्र, संजीव कुमार असताना अमजद भाईंना सचिनच्या मार्गदर्शनाची गरज कशाला आणि अमिताभ बच्चन तर अमजद खान यांचे मित्र होते. त्यामुळे गब्बर सिंहच्या भूमिकेकरता अमजद खान सचिन यांच्याकडे गेले नसावेत. रमेश सिप्पींचे सहकारी म्हणून सचिन यांनी पडद्यामागची भूमिका सुद्ध केली होती. त्यावेळी कदाचित टीमच्या चर्चांमध्ये सचिन यांचा सहभाग असेल. त्यामुळे सचिन असे म्हणत असतील. याचा अर्थ अमजद खान यांना सचिन पिळगावकर यांनी मदत केली. असे म्हणता येणार नाही. मागे एका मुलाखतीत सचिन हे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल बोलले होते. माझ्या चित्रपटात माझे संवाद बोलायचे. अधिकचे शब्द, संवाद बोलायचे नाहीत. हे ही सचिन यांचे म्हणणे मराठी प्रेक्षकांना पटले नाहीत. कारण लक्ष्मीकांत बेर्डे त्यावेळी मोठे स्टार होते. ते दिग्दर्शकांना चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करायचे आणि आपला संवाद उठावदार व्हावा म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे त्यात आपले शब्द घालायचे. हे सर्व दिग्दर्शकांच्या विचारातून व्हायचे. असे काही दिग्दर्शकांनी सांगितले आहे. मग सचिन पिळगावकर उगाच अर्थाचा अनर्थ करून मुलाखतीत बोलतात. त्यामुळे नवीन कलाकारांनी, दिग्दर्शकांनी असे कधीही बोलू नये.

 

ॲड. रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा