कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश.
सावंतवाडी
कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यांचा मृतदेह दरीत ३०० फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम, सांगली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एनडीआरएफची टीम सहभागी झाली होती. तसेच, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. सह्याद्री ॲडव्हेंचरस आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगली यांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू होते. अथक प्रयत्नांनंतर राजेंद्र सनगर यांचा मृतदेह दरीत १५० फुटांवर आढळला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक, हवालदार दीपक शिंदे, तसेच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. वीस तासानंतर हा मृतदेह सापडला.

