आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा
जिल्ह्यात शाळांमधून साकारला आरोग्य, मैत्री आणि प्रेरणेचा उत्सव
सिंधुदुर्गनगरी
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन २३ जून रोजी साजरा झाला. यानिमित्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ क्रीडा नव्हे, तर ऑलिंपिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर मेकिंग, संवाद सत्र अशा विविध उपक्रम पार पडले.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, मैत्री आणि परिश्रम यांचा अर्थ पोहोचवणे,असा कार्यक्रमाचा उद्देश होता. कणकवली येथील माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे देखील राहुल गायकवाड यांनी ऑलिंपिकच्या मूळ संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. जय भवानी इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर कुडाळ हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा मार्गदर्शक माधुरी घरळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवणारे मार्गदर्शन केले.
विशेष उल्लेखनीय उपक्रम परशुराम नाईक हायस्कूल, तेंडोली येथे पार पडले. या शाळेने कार्यक्रमाचे कल्पक नियोजन करुन, फिटनेस रन, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य लेखन व सामूहिक शपथविधी यांचे संयोजन केले, ज्यामुळे ऑलिंपिक मूल्यांची जाणीव अधिक ठळकपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजली. या सर्व उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक सहभाग लाभला.
या कार्यक्रमांनी केवळ एक दिवसाचा उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या मनामनात चिरकालासाठी ऊर्जा, अनुशासन आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेची बीज रोवली गेली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आला आणि ऑलिंपिक दिनाचा संदेश जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यात यश मिळवले.
