*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*”आषाढ” आणि “मेघदूत “*
*—————————*
*ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि गौरी गणपतीचा भाद्रपद ही मराठी महिन्यांची मालिका सुरू झाली की नव्या उत्साहाने मन आनंदी होते. उत्साह ओसंडून वाहू लागतो. सगळीकडे असे नवचैतन्याचे वातावरण असतानाच ज्येष्ठ सुरुच होतो. ज्येष्ठ येतोच वर्षा ऋतुच्या सोबतीने आणि मृगनक्षत्राशी खेळत खेळत.*
*आकाशात जलकुंभांनी भरलेले घननीळ आषाढ कृष्ण मेघ धसमुसळत जागा व्यापायला लागतात. अशा एकापाठोपाठ अनेक जलदावली संथ गतीने खाली ओथंबू लागतात. वाराही बेभान होऊन मेघांना ढकलतो. उन्मत्त ढगांचा गडगडाट, सौदामिनीचा भयावह कडकडाट, ऊन सावलीचा संपलेला खेळ, भरून अंधाराचं आलेलं आकाश, झाकोळलेला सूर्य , अशा सुखद नयनरम्य वातावरणात कुठेतरी मृगाचा शिडकावा होऊन मातीचा वेडावणारा मृदगंध पसरतो. मधेच येणा-या जलधारा आणि सर्वात सुंदर अशी नभांगणीची काळ्या सावळ्या निळ्या जांभळ्या धवल रंगात रूपेरी अंगांनी सजलेल्या कृष्ण मेघांनी भरलेली ओथंबलेली मेघडंबरी. हे सगळे आसुसलेल्या नजरेने चराचर पशुपक्षी झाडेझुडपे बघत असतात, आनंद सौंदर्य अनुभवीत असतात, सृष्टी आनंदाची गाणी ऐकत असते.*
*डोंगर माथे, माळरानावर वारा हिरव्या गवताच्या जावळामधुन हळूवार फिरत असतो. शेतात बाळरोपे जेमतेम उभी राहात जगाकडे डोकावून बघायला लागतात. अशा आनंदी वातावरणात आषाढ सुरू होतो. रामगिरी पर्वतावर एक शापित यक्ष खूप दुःखी असतो. तो त्याच्या प्रियेच्या विरहात आठवणींनी व्याकुळ झालेला असतो. या दु:खात तो कृश होऊ लागतो. असाच एकदा विलाप करीत असताना त्याचे हातातील सुवर्णकडे गळून पडते, इतकी त्याची दशा होते. सतत आपल्या प्रियतमेच्या आठवणीत विचारात रामगिरीवर बेचैन होऊन तो फिरत असतो. त्याची प्रिया खूप दूर कैलास पर्वताजवळ असलेल्या कुबेर नगरीत अलकापुरीत रहात असते. शापामुळे दोघे दुरावलेले असतात. “आपल्या प्रितीचा संदेश इतक्या दूरवरच्या प्रियेला आपण कसा द्यावा? आपणही तिच्या आठवणीत , विरहव्यथेत व्याकूळ होऊन गेलोय, हे तिच्यापर्यंत कसे पोहोचवावे?” अशा विचारात असतानाच त्याला रामगिरी पर्वतावर आषाढातले जलकुंभांनी भरलेले घननीळ कृष्ण मेघ दिसतात. काळे सावळे मेघ फारच लोभस दिसत होते. यक्षाला गंमत वाटली. किती सहजपणे हे मेघ आकाशात विहार करतात ! तितक्याच सहजतेने ते खाली उतरतात.*
*बघता बघता त्याच्या मनात आले की “हे मेघ असे विहरत जाऊन प्रियेकडे पोहोचतील का? पोहोचवतील का माझा संदेश तिला? नुसताच विचार न करता उतावळा झालेला यक्ष त्या कृष्ण मेघाला गाठतोच. अजिजीने विचारतो, “माझी प्रिया इथुन खूप दूरवर कैलास पर्वताजवळ असलेल्या कुबेर नगरीत अलकापुरीत रहात आहे. मी तिच्या विरहव्यथेत व्याकूळ झालो आहे. माझा हा संदेश तिला पोहोचवायला तूं मदत करशील का? काकुळतीला येऊन तो मेघाला सांगतो… “नाही तर तूं असंच कर ना…मी सांगतो तसा सत्वरी डोंगर, पर्वत, नद्या न चुकता पार करीत तिथे अलकापुरीत पोहोच बरं… जा च तू… अलका नगरीत माझी प्रिया माझ्यासारखीच विव्हळ झालेली..कृश झालेली ..उदास होऊन माझी वाट पहात गवाक्षात उभी दिसेलच ….. माझ्या आठवणीत दंग झालेली असेल…माझ्यासारखीच तिची दशा झालेली असेल…. अगदी सहजच ओळखशील तूं तिला…जा ना, रे … त्वरित निघच तू.. भेटतोस ना?…तिला संदेश दे की ..”मी सुद्धा तुझ्या इतकाच तुझ्या आठवणींनी व्याकुळ झालो आहे. व्यथित आहे.” सांग मला तू चुकणार नाहीस ना? वाट बदलणार नाहीस ना?*
*इतक्या काकूळतीने यक्षाची व्यथा ऐकून तो मेघ गहिवरला आणि त्याच्या नयनातुन जलधारा वाहू लागल्या. आषाढ सरी जोरदार धरणीवर कोसळू लागल्या. खरोखरचा बुद्धीवान, प्रतिभावंत, कविराज कालीदास म्हणजे सरस्वती पुत्रच होता. “मेघदूत” या महाकाव्याचा रचयिता ….आषाढाचा पहिला दिवस…झाकोळलेले आकाश…घननीळ कृष्ण मेघ, यक्ष आणि आषाढमेघाची भेट. रामगिरी, त्या विरहव्यथेत काकूळतीला आलेला यक्ष… आषाढमेघाची भेट… सुंदर वर्णन केलेली अलका पुरी,…हे वर्णन तर अप्रतिमच आहे. त्याबरोबरच सहजपणे फिरणा-या मेघाबरोबर संदेश पाठविण्याची कल्पना या सगळ्याच गोष्टी अजरामर करून ठेवल्या आहेत.*
*आषाढाच्या पहिल्याच दिवशी “मेघदूत ” आणि “कविराज कालीदास” यांची आठवण झाली नाही असा साहित्य प्रेमी सापडणार नाही. “आषाढस्य प्रथम दिवसे”….या ओळीसह मेघदूत व कालिदास हे कितीही काळ लोटला तरी साहित्यात, कवी मनांत अढळ स्थानी राहतील.*
—————————————-
अनुराधा जोशी.
अंधेरी. मुं. 69
9820023605