*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*मी पुतळाबाई..*
आषाढ शुद्ध एकादशी १६०२. आज स्वामींना जाऊन पंच्यांशी दिवस झाले.स्वामींचे प्राणोत्क्रमण झाले आणि मी मनोमन
सती जायचे ठरवले.महाराजांची मी तिसरी राणी. सती जाण्याचा
निर्णय मात्र माझा एकटीचा. महाराजांनी सतीप्रथेला विरोध
शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर माँसाहेबांनी सती जाण्याची तयारी केली होती. मात्र महाराजांनी त्यांना रोखले.
स्वराज्याला आपली गरज आहे माँसाहेब!आम्हाला पोरके करु नका!आपणासी या स्वराज्याची आण आहे.’
त्यानंतर राज्यात सतीची प्रथा बंद झाली. ती सक्तीची राहिली
नाही.
मी मात्र सती जाण्याचा निर्णय घेतलाय्…
आज सगळा इतिहास डोळ्यासमोरुन सरकतोय. सई राणी
साहेब गेल्या आणि शंभु राजे पोरके झाले. मी निपुत्रीक.
अत्यंत मायेने, वात्सल्याने मी शंभुबाळाला पदरी घेतले. आईच्या
मायेने त्यांना वाढवले. महाराजांच्या स्वार्या,स्वराज्याची घडण,
रयतेची काळजी यात रायगड व्यस्त होताच. पण वातावरणातले कौटुंबिक कलह मनाला त्रास देत होते. सोयरा राणीसाहेब महाराणीपद सांभाळत असताना त्यांचा कावेबाजपणा
नजरेआड होउ नव्हता शकत. स्वार्थ, सत्तालोलुपपणा ,सवतासुभा, सावत्रपणा मनाला जाचत होता.शंभुराजांबद्दल
मन सदैव चिंतीत असे. मी त्यांच्यावर सुसंस्कार करण्यासाठी
धडपडले. या कारस्थानांपासून त्यांना दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. शंभु राजे आम्हाला बिलगत. आईच्या मायेने मी
त्यांना कवेत घेई.ते म्हणत,”तुम्हीच माझी माता आणि तुम्हीच
पिताही. ‘
महाराजांना कां समजत नव्हते. गृहकलहाने तेही त्रस्त होत.
कधी महालात एकटेच येरझारा घालत. वाटे त्यांच्या सांत्वनाला
थांबावे. आम्ही सदा झुकूनच राहिलो. त्यांचे चरणदर्शनच आम्हांसी आनंद देई. पण महाराज म्हणत,
“या!पुतळाबाई! स्वराज्याचा इतका मोठा डोलारा आम्ही सांभाळू शकलो पण ही घरभेदी! आम्हाला तुमचाच आधार वाटतो! सईबाई गेल्या. शंभुराजे पोरके झाले. आम्ही त्यांना
घडवू शकलो नाही. आम्ही त्यांना वेळच दिला नाही. पण
तुम्ही मायेचा महामेरु! वात्सल्याचा झरा आहात! तुम्ही शंभु
राजांना ओटीत घेतले. आम्ही कृतज्ञ आहोत! पुतळाबाई आम्हाला तुमचाच भरवसासा आहे!”
अगबाई! एव्हढा निश्चयाचा महामेरू आणिआज सूर्याच्या नयनात हे टपोरे अश्रु?
वेळोवेळी याच जाणीवेने आम्ही जगलो की आपण केवळ महाराणी नाही. आपण रयतेची माय आहोत.सुराज्य हा आपला
बाणा! त्यापेक्षा मोठे काही नाही. सोयराबाईंचं धारदार पण कपटी राजकारण मनाला क्लेष द्यायचे. पण रायगडावर
पडद्यामागे राज्य त्यांचे होते. माणसंही त्यांची होती.
एकदा मी त्यांना म्हणाले होते ,”वारसा गादी संपत्ती हे शब्द आहेत! महाराजांसारखा राजा गादीला मिळावा हेच स्वप्न!
गादीवर कोण बसणार यापेक्षा स्वराज्याला दुसरा शिवराया
मिळणार का? याचे उत्तर हवे.”
राजे गेले. संभाजी राजे रायगडावर नव्हतेच. अंत्यविधीही घाईघाईत उरकवले. कारभार्यांच्या कारस्थानांना ऊत आला होता. राजारामाचे नांव निश्चीत झाले. राजाराम आणि शंभु मधले बंधुप्रेम सर्वज्ञातच होते! पण हा डाव होता. कपट होते. म्हणून
ह्रदय पिळवटले.शंभुराजांसाठी मन तुटत होते.
आज पंच्यांशी दिवस लोटले राजांना जाऊन. मोहिते घराण्यातील ही कन्या, मोहिते आणि भोसले दोन्ही घराण्यांचा
नावलौकीक ठेऊन जगली. राजे गेले आणि मी जीवनाकडे पाठ फिरवली. राजकारणाच्या बजबजपुरीला ठोकलेला तो रामराम
समजा! मी जर सती गेले नाही तर इतिहास बदलेल का?
लोक म्हणतील का संभाजीकरिता पुतळाबाई आज हवी होती!
माहीत नाही काळाच्या मनात काय आहे. पण या पृथ्वीतलावरचे
आपले वास्तव्य इतकेच.एका कपट कारस्थानाच्या इतिहासाची मी साक्ष आहे. पुरावा आहे. तो माझ्या जाण्याने नष्ट होईल कां?
पण माझे मन आता निश्चल आहे. स्वामींचे जोडे मी ऊराशी कवटाळले आहेत.आणि समोर आहे धडधडणारी चिता…!!
हर हर महादेव! जय भवानी!
राधिका भांडारकर.

