You are currently viewing आषाढीची वारी

आषाढीची वारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एका खेड्यातील महिलेचं पांडुरंगास् सांगणं* 

 

*आषाढीची वारी* 

 

आली आषाढीची वारी

कसं जावं ग पंढरी ?

ये रे बा विठ्ठला

औंदाच्या साली घरी

 

धनी माझा थकलेला

कंबर त्याचं धरलं

गुडघे चालू देत नाही

वारीला येणं चुकलं

 

पीक नाही पाणी नाही

मालाला नाही भाव

उजाड रखरखलेलं

दिसेल माझं गाव

 

येता गाव कुसावर

लागे कुंभाराचा घर

लिंबोणीच्या झाडाखाली

बांधलेली गुरढोरं

 

मंदिराच्या समोरचं

दिसेल माझं घरकुल

वाड्यात दिसतसे

तीन दगडांची चुलं

 

तुझा भजनात जातं

रंगुनिया माझं गीतं

गाते जनीचा अभंग

चाले घरघरं जातं

 

दुष्काळाने येणं केलं

सारी विहीर आटली

कसं करु पांडुरंगा

पोरं लगनाला आली

 

ये बैस घडीभर

उभा युगे अठ्ठावीस

पंढरीचा नाथ आला

किती करू उठबस्

 

माझ्या निर्धन कुडीत

गरिबीचे थालीपीठ

जेवे माझा पांडुरंग

वामांगी रुख्माई नीट

 

माझे मायबाप आले

दर्शनात झाले दंग

काढीते दृष्ट तयांची

गाते जनीचा अभंग

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा