“सगळेच राजकीय पक्ष राज ठाकरे यांच्या प्रेमात का पडले”???
… ॲड. नकुल पार्सेकर…
मला आठवतं, मी जेव्हा पहिल्यांदा सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयात आलो तेव्हा जिल्ह्यातील इतर तालुक्यातून अनेक मुले आणि मुली यायच्या, याचे कारण तेव्हा संपूर्ण जिल्ह्यात फक्त सावंतवाडीतच शास्त्र शाखा होती. त्यामुळे सायन्स घेऊन पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी रत्नागिरी शहर सोडले तर दुसरा पर्याय नव्हता.
एका तालुक्यातून एक बाॅब कट केलेली सुंदर गोरीपान मुलगी त्यावेळी सुप्रसिद्ध असलेली पद्ममीनी कार घेऊन यायची. त्यामुळे ती सगळ्यांचीच आकर्षण बिंदू होती. गेले दोन महिने महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मिडियाचे केंद्रबिंदू आणि आकर्षण बिंदू आहेत. भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, फुटीर सेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि राज यांचे चुलतबंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्ववजी हे तिघेही राज यांच्यावर डोळा मारत आहेत आणि डोळा ठेवून पण आहेत. राज ठाकरे हे कसलेले “प्रेमवीर” आहेत त्यामुळे तब्बल गेले दोन महिने हा “आ गले लग जा” चा सिलसिला सुरू आहे. बारा जूनला अहमदाबाद येथे झालेला दुर्दैवी अपघात, जागतिक पातळीवर सुरू असलेले इस्ञाईल- इराण युद्ध या दोन महत्त्वाच्या बातम्या पेक्षाही महाराष्ट्रातील मिडियाने राज ठाकरे कुणाच्या गळ्यात माळा घालतात या बातमीला प्राधान्य दिलेले आहे.
राज ठाकरे यांची मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निकालावर परिणाम करण्या इतपत ताकद आहे त्याचप्रमाणे सोन्याची अंडी देणारी कोंबडी जर आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर एक एक नगरसेवक निवडून येणे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेतल्याशिवाय भाजपाचे चाणक्य अमीतभाई शहा शांत झोपणार नाही. महाराष्ट्र भाजपाचे चाणक्य मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी पण वाट्टेल ते करुन महानगर ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार यात शंका नाही.
देशाची आर्थिक राजधानी, एकट्या केरळ राज्यापेक्षाही वार्षिक अर्थसंकल्प असलेली महानगरपालिका. मातोश्रीचा हा आॅक्सीजन आहे. मराठी कार्ड दोन्ही ठाकरे बंधू खेळत आहे त्यामुळे मराठी मतांचे विभाजन झाले तर गुजरात लाॅबीचे स्वप्न साकार होणार. अदानींचे प्रस्तावित लाखो हजार कोंटीचे प्रकल्प, महानगराच्या पायाभूत सुविधांसाठी येणारा प्रंचड निधी आणि पक्षाचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठीचा मुख्य स्रोत असणारी ही मायानगरी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीची मातोश्रीची धडपड आणि मातोश्रीचा श्वास बंद करण्यासाठीचा भाजपाचा टोकाचा प्रयत्न यामुळे काही मतदारसंघात निकालावर परिणाम करणाऱ्या मनसेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिन्ही पक्षांनी राजकारणाच्या समुद्रात जाळी टाकलेली आहेत… आता हा मासा कुणाच्या जाळ्यात अडकतो… कुणाला हम बने तुम बने एक दुजेकेलिए.. म्हणतो हे पहाण्यासाठी या महाराष्ट्रातील मनसैनिक व शिवसैनिक आतूर आहेत. जोपर्यंत मनसे प्रमुख तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या माळा असे म्हणून गळ्यात गळे घालत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील मिडिया आपली करमणूक सुरूच ठेवेल हे निश्चित.