सुलोचना साळकर यांचा मृतदेह आढळला तिलारी कालव्यात
दोडामार्ग
कसई (ता. दोडामार्ग) गावठणवाडी येथील ८० वर्षीय वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर या गुरुवारी दुपारी शेजारील शेतात गेल्या होत्या. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्या घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्यांचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.
त्यानंतर त्या तिलारी डाव्या कालव्यात पडल्या असाव्यात, या संशयाने शुक्रवारी सकाळी कालव्यातील पाणी बंद करून शोधाशोध सुरू करण्यात आली. या शोधादरम्यान त्यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला.
या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दोडामार्ग पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.