सिएटल: बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी २०२१ सालासाठीचे वार्षिक पत्र शुक्रवारी शेअर केले, द इयर ग्लोबल हेल्थ वेण्ट लोकल असे पत्राचे शीर्षक आहे. या वर्षीच्या पत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी कोविड-१९ साथीचा जगभरात झालेला परिणाम आणि सामाजिक आरोग्यासाठी झालेल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या प्रयत्नामधील जागतिक समन्वय व वैज्ञानिक नावीन्यपूर्णता यावर प्रकाश टाकला आहे. जग या साथीतून अधिक कणखर आणि निरोगी होऊन बाहेर पडेल असा आशावाद त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
कोविड-१९ आजाराने अनेकांचे प्राण घेतले, लक्षावधींना आजारी केले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला एका विनाशकारी मंदीच्या गर्तेत ढकलले. यातून सावरण्यासाठी अद्याप आपल्याला अजून दीर्घ प्रवास करणे आवश्यक असले, तरी नवीन चाचण्या, उपचारपद्धती व लशींच्या स्वरूपात जगाने काही लक्षणीय विजय साध्य केले आहेत. या नवीन साधनांनी लवकरच समस्यांचे निराकरण होऊ लागेल, असा विश्वास बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी व्यक्त केला आहे.
साथीवर मात करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जगभरातील उदार व्यक्तींनी संसाधनांच्या स्वरूपात देणग्या दिल्या. प्रतिस्पर्ध्यांनी संशोधनातील निष्कर्षांचे आदानप्रदान केले आणि अनेक वर्षांच्या जागतिक गुंतवणुकीने विक्रमी वेळात लसीचा विकास, सुरक्षित डिलिव्हरी व प्रभावी लस यांचे नवीन विश्व खुले केले, असे बिल आणि मेलिंडा यांचे म्हणणे आहे.