You are currently viewing मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

सिंधुदुर्गनगरी 

लहान मूल हे कोऱ्या पाटीप्रमाणे असते. त्या पाटीवर जसे गिरवाल तशी त्याच्या आयुष्याची जडणघडण होत जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची मुख्य आणि महत्वाची भूमिका कोणाची ? तर ती त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची आहे. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जिल्हा परिषद शाळा क्र.2 मधील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संवाद साधला.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  मूल लहान असताना त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलासमोर पालकांनी मोबाईल घेऊन बसू नये कारण ते अनुकरणप्रिय असल्याने त्यांना तशी सवय लागू शकते.  पालक कितीही व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी नक्की द्यायला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याच्या शाळेमध्ये काय चालू आहे ? त्याला शाळेत काय शिकवले जाते, त्याला योग्य प्रकारचा आहार मिळतो का हे सुद्धा पालकांनी पाहावे. शिक्षकांनी देखील विद्यार्थांना अद्ययावत ज्ञान देण्यावर भर द्यावा. त्यांना नवनवीन गोष्टी शिकवाव्यात. शिकवताना सामान्य ज्ञान कसे वाढेल हे पाहावे. त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्यावा. शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील रहावे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री आंगणे, मंडळ अधिकारी एकनाथ गंगावणे, तलाठी श्री कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रसिका गोसावी, व्यवस्थापन समती उपाध्यक्षा ज्योती गोसावी, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा साईल, माता, पालक संघाचे उपाध्यक्ष उन्नती साईल, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रसाद पाताडे, दादा साईल, चंद्रकांत साईल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा