वेंगुर्ला मठ येथे ५० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त : एक ताब्यात
वेंगुर्ला :
वेंगुर्ला पोलिसांनी आज सकाळी मोठी कारवाई करत सुमारे ५० लाख ९० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ती वाहतूक करणारा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १७ जून रोजी सकाळी ६ वाजता वेंगुर्ला तालुक्यातील मठ चेकपोस्टजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी धर्मेश कुमार पुरुषोत्तम चोबीसा (वय ४४, रा. सुरखंडा, ता. सराडा, जि. विजयपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये, २० लाख रुपये किमतीचा युपी-२१-ईटी-००४१ क्रमांकाचा आयशर टेम्पो आणि त्यात गोवा बनावटीच्या प्लास्टिक बॉटलमध्ये भरलेले दारूचे १०५० बॉक्स असा ५० लाख ९० हजार रुपये किमतीची दारु असा एकूण ७० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, हेड कॉन्स्टेबल डोमणिक डिसोजा, हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, हेड कॉन्स्टेबल जॅक्सन घोंसलविस आणि पोलीस कॉन्स्टेबल कांडरया यांनी यशस्वीपणे पार पाडली.
याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.
