You are currently viewing कुडाळ एसटी आगार अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्न राहील – आम. निलेश राणे

कुडाळ एसटी आगार अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्न राहील – आम. निलेश राणे

शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध; आम. निलेश राणे

कुडाळ एसटी आगारातील पाच बसचे आमदार राणेंच्या हस्ते लोकार्पण

कुडाळ :

एसटी प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात एसटी प्रमुख अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्यासमवेत विशेष बैठक आयोजित केली जाईल. एसटीचे जे जे प्रश्न असतील ते परिवहन मंत्री, महायुती सरकार मधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडविले जातील. सिंधुदुर्गासह राज्यात कुडाळ एसटी आगार अव्वलस्थानी नेण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे नव्या एसटी बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात दिली.

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ एसटी आगाराला प्राप्त झालेल्या ५ नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी येथील बसस्थानकावर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस मंडल तालुकाप्रमुख दीपक नारकर, एसटीचे यंत्र विभाग प्रमुख सुजित डोंगरे, आगार प्रमुख रोहित नाईक, स्थापत्य अभियंता श्री.केंकरे, वाहतूक निरीक्षक पल्लवी बर्वे, शहरप्रमुख ओंकार तेली, सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय प्रतिनिधी रोशन तेंडोलकर, विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, दिनेश शिरवलकर, महेश तावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, पावशी सरपंच वैशाली पावसकर, चेतन पडते, सुनिल बांदेकर, चंदन कांबळी, रोहीत भोगटे, आबा धडाम, रेवती राणे, बाळा पावसकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एसटी अधिकारी-कर्मचारी व प्रवासी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे उपस्थित होते.

आ.राणे म्हणाले, अधिक गतिमान असणारे राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसे व जनता यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर कसे असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवीन अद्ययावत दाखल झालेल्या लालपरी होय. भविष्यात कुडाळ आगाराचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडविण्यासाठी महायुती सक्षम आहे. अवघ्या पंधरा दिवसात मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ या पाच बसेस दिलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचे किंवा इतर जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे, हे सर्व महायुती सरकारमुळेच होऊ शकले. अनेक विकास कामे झाली आहेत ही विकास कामे जरी निलेश राणे यांच्या नावाने झाली तरी त्याचे श्रेय हे महायुतीचेच आहे. या बसस्थानकाच्या कामाबाबत कोणावर मी टीका करणार नाही. टीका करण्यापेक्षा दुरुस्तीचे काम करणे हे आपले काम आहे. ते काम मी महायुतीच्या माध्यमातून करताना संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ बस स्थानक अव्वलस्थानी कसे राहील या दृष्टिकोनातून काम करणार आहे तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो प्राधान्याने सोडवण्यासाठी तसेच कुडाळच्या विकासाचे स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब या सेवाभावी संस्था तसेच इतर संस्था येथील नागरिक यांच्या माध्यमातून त्यांना जो प्लान आवडेल त्यानुसार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवताना ते प्राधान्याने सोडवण्यासाठी महायुतीच करू शकते ते अवघ्या सहा महिन्यात हे विकासाचे दालन दिसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच शहराच्या विकासात भर पाडणारे नजिकचे कुडाळ पिंगुळी रस्त्याचे रुंदीकरण होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान या रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या दुकानदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या जागेचा मोबदला घेऊन निर्णय घेतला जाईल असे आ.राणे यांनी सांगितले.

दादा साईल म्हणाले, या आगाराला नवीन बसेसची गेले अनेक दिवसांची मागणी होती आणि ती मागणी आ.राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे. नवीन बसेस मिळण्यासाठी आ.राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच बसेस आगाराला प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित पाच बसेस लवकरच उपलब्ध होतील. आ.राणे यांनी निवडुन आल्यापासून जनतेसाठी असलेल्या सेवा सुधारण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडण्यासह विकासकामांचा जो धडाका लावला आहे, त्याचाच हा एक भाग आहे. या आगाराला सीएनजी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या सीएनजी गॅस स्टेशन याच आगारात होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील नंबर एकचा आगार बनविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी करून, बंद असलेली कुडाळ – शिर्डी बसफेरी पुन्हा सुरू करण्याबाबत लक्ष वेधले.

आगार प्रमुख रोहित नाईक म्हणाले, आ.निलेश राणे यांच्या अथक प्रयत्नांतून कुडाळ आगाराला मंजूर झालेल्या दहा पैकी पाच नवीन बसेस पहिल्या टप्प्यात आगाराला प्राप्त झाल्या आहेत. अद्ययावत प्रणाली असलेल्या या बसेस आहेत. डिझेलवर चालणा-या या बसेस असून साध्या दरात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या बसेस मध्ये अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा हा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन, त्यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर यांनी केले. दरम्यान आ.राणे यांनी यांनी कुडाळ बसस्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत या बसमधून प्रवास केला. या बसचे सारथ्य चालक रोशन तेंडोलकर यांनी केले. प्रवाशांनीही या नव्या को-या एसटी बस सोबत आपले फोटो टिपले.

प्रतिक्रिया व्यक्त करा