*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव संस्थेच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
आल्या रिमझिम सरी
आल्या रिमझिम सरी
गंध मातीच्या वासात
थेंब थेंब करी नाच
धुंद मृदेच्या श्वासात….. 1
तेजाळल्या आकाशात
लालनिळी वीज दाटे
सळसळ नागमोडी
कडाडता भय वाटे…. 2
रंग करडा सावळा
काळ्या ढगांनी लेवूनी
आभाळाला झाकोळत
आला सरींना घेऊनी…. 3
झाला अंधार गहन
वारा ढग घुसळतो
खोटी झुगारुनी भीती
सागरात उसळतो…. 4
लाट झिम्माड पाण्याची
भाव दाटूनी येतात
बाधा भीतीच्या विषाची
खुणा वाहुनी नेतात…. 5
आज व्याकुळ किनारा
चिंब ओला भिजणार
काही नि:शब्द वेदना
शब्द नवा विणणार…. 6
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
