– आमदार नितेश राणे…
सिंधूदुर्गनगरीत पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
ओरोस
आतापर्यंत जिल्ह्यातील पत्रकारांची सर्वोच्य बातमी देण्यासाठी असलेली स्पर्धा आपण पाहत आलोत. मात्र, गेल्या वर्षी पासून पत्रकारांच्यातील स्पोर्टमनची अनुभवता येत आहे. कोरोनाच्या दृष्टीने आरोग्याला व्यायामासारखी गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पत्रकार, राजकीय व्यक्ती यानी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. यादृष्टीने पत्रकारांसाठी आवश्यक क्रिकेट स्पर्धा आवश्यकच आहे. मात्र, त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय लोकांना लेखनीच्या जोरावर नाचवीणारे पत्रकार विरुद्ध राजकीय पुढारी यांची क्रिकेट स्पर्धा भरवावी. यावेळी जिल्ह्याला राजकीय लोकांत अंतर्गत किती समन्वय आहे, याचा अनुभव घेता येईल. अशी स्पर्धा आपण घेतल्यास पहिले नाव आपले असेल, असे प्रतिपादन आ नितेश राणे यानी शुक्रवारी सिंधूदुर्गनगरी येथे पत्रकार क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने सलग दुसऱ्या जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवशीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सिंधूदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर केले होते. यावर्षी ही स्पर्धा पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने प्रायोजित केली होती. याचा शुभारंभ आ नितेश राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व पहिल्या सामन्याचा शुभारभ नाणेफेक करून झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, संतोष वायंगणकर, शेखर सामंत, महेश सरनाईक, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा सचिव उमेश तोरसकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, संतोष वालावलकर, आयोजक मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, कुडाळ अध्यक्ष विजय पालकर, कणकवली अध्यक्ष भगवान लोके, बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांच्यासह जिल्हाभरातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी आ राणे यानी राजकीय लोक मतांच्या मागे फिरत असतात. पत्रकार बातमीसाठी फिरत असतात. मात्र, यात आरोग्याकडे दोघांचेही दुर्लक्ष होते. परंतु २०२० मध्ये आलेल्या कोरोना विषाणुने आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा महत्वाची आहे. किती पत्रकारांचा फिटनेस चांगला आहे, हे सिद्ध होणार आहे. नुकत्याच पडलेल्या सरपंच आरक्षणात जिल्ह्यात महिला राज आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांची पत्रकार संख्या वाढली पाहिजे. भविष्यात महिला पत्रकारांचा क्रिकेट संघ तयार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आ राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ झाला. तसेच कणकवली विरुद्ध कुडाळ यांच्यात झालेल्या शुभारंभ सामन्याची नाणेफेक सुद्धा त्यांनी केली. यानंतर आ राणे बॅट घेवून मैदानात उतरले. त्यांना जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष जेठे यानी गोलंदाजी केली. मात्र, यावेळी राजकरणातील आक्रमकपणा आ राणे येथेही दाखवून दिला. एका षटकात तीनवेळा चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचविला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवारांचे स्वागत मुख्यालय अध्यक्ष संदीप गावडे यानी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद दळवी यानी केले.