*लेखक रविंद्र शंकर पाटील लिखित अप्रतिम कथा*
*ऑक्सिजन*
गेल्या वर्षीचीच गोष्ट. दिवस आजचाच — वटपौर्णिमा.
मेघा दरवर्षी हा सण अत्यंत श्रद्धेनं पाळते. आजही सकाळपासून वटपौर्णिमेचे शुभेच्छांचे मेसेज व्हॉट्सॲपवर यायला लागले…
मी (गालातल्या गालात हसत): “आजही वटपौर्णिमा… म्हणजे, तिचा उपवास ठरलेला!”
तसं आमचं सगळं सुरळीत सुरू होतं — माझा चांगला जॉब, तिचाही, छानशी सोसायटी, प्रशस्त फ्लॅट, आणि एक दुचाकी — ज्यावरून मी रोज तिला स्टेशनवर सोडतो आणि परत आणतो.
सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे आमची लेक — कस्तुरी. ती आता दीड वर्षांची. त्यामुळेमेघा पुन्हा नोकरीवर रुजू झाली आहे, कस्तुरीला तिची आई सांभाळते — अगदी आपुलकीनं. म्हणून आम्ही दोघंही निर्धास्त.
नेहमीप्रमाणे त्या दिवशीही मेघाला स्टेशनवर सोडलं आणि मी कंपनीकडे वळलो.
सिक्युरिटी (थोडा घाईत): “सर, मॅनेजर साहेबांनी ताबडतोब बोलावलंय.”
मी (थोडासा अस्वस्थ होत): “असं अचानक? बरं, जातो लगेच.”
भेट झाली. काही बोलणी झाली. आणि… थेट घरी परत.
कारण, कंपनीनं मला घरी बसवलं होतं. सगळं क्लिअर केलं, वस्तू परत दिल्या, थरथरत्या हातांनी पीएफचा चेक घेतला आणि शेवटचा ‘रामराम’ ठोकला.
दार उघडलं. घर सुट्टीसारखं वाटलं.
कस्तुरी (हसत धावत आली): “बाबा!”
मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं… आणि डोळे भरून आले. त्या हसऱ्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं यासाठी आतून हादरलो होतो.
मेघाला फोन लावला.
मी (धीरगंभीर आवाजात): “जशी आहेस तशीच घरी ये.”
ती विचार न करता धावत आली. दार उघडलं आणि मला पाहून तिच्या जिवात जीव आला.
मी (तडक म्हणालो): माझी नोकरी गेली.
ती शांतपणे आत आली. किचनकडे वळली.
पाणी प्यायली, मलाही पाणी दिलं. म्हणाली — “जाऊ दे ना… दुसरी मिळेल की नोकरी! तोवर माझा पगार आहे ना. तुझ्या कंपनीचं बॅडलक!”
मी स्तब्ध झालो. तिच्या डोळ्यांत माया, ठामपणा आणि अव्यक्त धीर स्पष्ट दिसत होता.
पण मनात विचारांचे काहूर — कस्तुरीचं शिक्षण, घराचे हप्ते, लाईट बिल, मेंटेनन्स… हे सगळं कसं निभावणार? मी एव्हाना नोटा संपलेलं एटीएम झालोय! ह्याची मला जाणीव झाली होती.
पण ती दररोज मला ऑक्सिजन सिलेंडरसारखी उभारी देत होती. तिला सोडून आलो की, मी कस्तुरीजवळ थांबत असे. सासूबाईंनाही घरकामात आराम मिळायचा.
मी घरात राहून नोकरी डॉट कॉमवर रोज बायोडेटा टाकत राहायचो. उत्तर मात्र कुठूनच नसायचं.
मित्रांकडून सहकार्य मिळत होतं, पण तिनं आधीच ठाम सांगितलं होतं —”सल्ला घ्या, पण कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत.”
मी सर्वांना कॉल करून जॉबबद्दल सांगितलं. सर्वजण खरंच प्रयत्न करत होते. पण शेजारी मात्र टोमणे मारायचे.
शेजारी (खोटं हसत): “जॉब गेलाय वाटतं…”
मी वैतागायचो. पण ती पुन्हा समोर यायची. “लोकांना तुझं घरी असणं त्यांच्या स्वतःच्या अपयशाचं समाधान वाटतं. पळू नकोस. सामोरा जा!”
मी सांगू लागलो — “हो, जॉब गेलाय. नवीन शोधतोय. मिळेलच!”
चार महिने झाले. कस्तुरी आणि मेघा दोघींनी मला सावरलं. मी प्रयत्न सोडले नाहीत.
एक दिवस माझा मित्र दिन्या घरी आला.
दिन्या: “मुलाचा अकाउंट्स अडलाय. शिकवशील का? तू सध्या घरीच असतोस ना…”
मी (मनात): “हेच वाक्य मी हजार वेळा ऐकलंय!” मी सटकलो, “नाही जमणार!”
संध्याकाळी मेघा आली. तिला सगळं सांगितलं.
मेघा (हसून): “नेहमी लोकांच्या बोलण्याचा चांगला अर्थ घ्या. कॉलेजला टॉपर होतास ना तू? त्याच्या मुलाच्या जागी आपली कस्तुरी असती, तरी असंच उत्तर दिलं असतं का? इगो बाजूला ठेव. त्याचं समाधान तुझ्या दुःखावर उपाय ठरेल.”
तिचं सांगणं मला पटलं.
मी दिन्याच्या मुलाला शिकवलं. तो पास झाला. पुढच्या सेमिस्टरला तोच पंधरा-वीस मुलांना घेऊन आला. घरात तीन बॅचेस सुरू झाल्या. दिवस पुरत नव्हता. मेघाने माझ्या निस्तेज शरीरामध्ये आत्मविश्वासाचा ऑक्सिजन भरला आणि आमची गाडी पुन्हा रुळावर आली. मी ठरवलं — “कितीही खडकाळ रस्ता असो, आता मी गाडी रेटतच राहणार!”
एक दिवस सहज मेल चेक केला. दहा महिन्यांपूर्वी पाठवलेल्या सीव्हीला रिप्लाय आलेला! मी लॅपटॉप बंद केला. (हसत स्वतःशीच) “नाही… आता नको. धरली वाट सोडायची नाही!”
आज वटपौर्णिमा. तिथीनुसार एक वर्ष पूर्ण. माझ्या बॅड पॅचचा वाढदिवस. व्हॉट्सॲपवर मेसेज यायला लागले. वटपौर्णिमा, मेघा आणि उपवास हे कॉम्बिनेशन आठवलं. ठरवलं — आज तिच्यासाठी मी उपवास करणार. ती प्रेमळ, समजूतदार, न बोलता आयुष्याला अर्थ देणारी…
ती कामावर निघायच्या गडबडीत होती. तितक्यात तिचा फोन वाजला. तयार होताहोताच ती फोनवर बोलत होती आणि तिच्या चेहर्यावरचे हावभाव बदलू लागले. ती फोन कट करून माझ्याजवळ आली. (हसत म्हणाली) “मला प्रमोशन मिळालंय! आता मी स्पेशालिस्ट नर्स ऑफिसर झाले!”
मी (गालातल्या गालात हसून): “अभिनंदन मेघु…! उपवासाची गोड सुरुवात झाली!”
“हॅपी वटपौर्णिमा…*
हा खरा नवऱ्याला दिलेला ऑक्सिजन…
तोडलेल्या फांदीला दोरा गुंडाळण्यात काय अर्थ?
पुरुष मानसिकदृष्ट्या नाजूक असतात — त्यांना मानसिक उभारी बायका देऊ शकतात. म्हणूनच, बायकांनी वडाला फेऱ्या मारायच्या, की सतत समजूतदारपणे संसार सावरायचा हे ठरवावं. “बायको वडाला फेऱ्या मारते… पण आयुष्याला जो खरा ऑक्सिजन देते, तो न बोलता तिच्या वागण्यातून!”
*@रविंद्र शंकर पाटील, मुंबई*
मोबाईल : ८९२८४९०२६०