मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या गौरवप्रसंगी, ६ जून २०२५ रोजी, मराठा महासंघाच्या वतीने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी – पाचाड येथील हॉटेल शिवशक्ती परिसरात – पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘एक झाड शिवरायांसाठी’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली रोपे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. जिल्हा संपर्कप्रमुख रामचंद्र भिलारे यांच्या हस्ते हे पूजन संपन्न झाले.
यानंतर गडावरून खाली येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील शिवभक्तांचे रोपे देऊन औक्षण व सन्मान करण्यात आला. “आपल्या गावी जाताना रायगडाची आठवण म्हणून एक झाड लावा, शिवरायांना मानवंदना द्या” असा संदेश देत पर्यावरणप्रेम आणि शिवप्रेम यांचा सुंदर संगम साधला गेला.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रुपेश कदम, संपर्कप्रमुख रामचंद्र भिलारे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन सावंत, महाड तालुका अध्यक्ष काशीराम लामजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून रायगडाच्या पवित्र भूमीवर घेतलेल्या या उपक्रमाचे महत्त्व उलगडले.
सदर कार्यक्रमानिमित्त जिल्हा व तालुकास्तरावरील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या, त्या पुढीलप्रमाणे: जिल्हा सरचिटणीस : अर्जुन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष : वासुदेव कदम, गणेश देशमुख, जिल्हा चिटणीस : आनंद निंबरे, जिल्हा सह संपर्कप्रमुख : रविंद्र कुडपाणे, महाड शहर प्रमुख : राजेश मालुसरे, पेण तालुका सरचिटणीस : संजय कदम, पनवेल तालुका अध्यक्ष : उदय भोसले, तालुका सरचिटणीस : सुहास सावंत, सुधागड पाली तालुका अध्यक्ष : निलेश देशमुख, पाली आपटे अध्यक्ष : शरद चौरगे, रोहा शहर संपर्क प्रमुख : कविताताई शिर्के
कार्यक्रमाला उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष अशोक देसाई, उपाध्यक्ष सतीश जाधव, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष महेंद्र तावडे, दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, पेण तालुका अध्यक्ष नितीन चव्हाण, रोहा शहर महिला अध्यक्षा दिपाताई भिलारे, तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘पर्यावरण रक्षण हीच खरी शिवसेवा’ या भावनेने प्रेरित होत, मराठा महासंघाने घेतलेला हा उपक्रम पर्यावरण जतन आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला. रायगडाच्या साक्षीने पार पडलेला ‘शिवराज्याभिषेक दिन’ यंदा विशेषतः सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवा रुजविणारा ठरला, हे निश्चित!