*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन- रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बदलते सहप्रवासी*
बालपणीची गंमत न्यारी; कट्टा न कळे कोणाला
तारूण्यातील गप्पा मात्र; सरेनात कट्ट्यावरल्या
संसारामध्ये सय त्या आठवणींची; श्वास होतो जडभारी
शब्दाविन संवादाचा अर्थ; का व्यर्थ लावावा काहीतरी
प्रौढत्वी निज पिल्लांच्या; संगती जावं लागतांना
सोडूनी मित्रमैत्रिणी; आणिक सोयऱ्याधायऱ्यांना
परप्रांतामध्ये पुन्हा; जमवावे नवे सांगाती
मानावी हीच आपली; माणसं आणि नाती
पुन्हा लावावा जीव तयांना; आणिक मैत्र जोडावे
त्यांच्या संगे हास्यविनोदे, Evergreen जगणं जाणावे
पिल्लांसंगे पुन्हा कोणी; तेथुनही जेव्हा जातात
आठवणींचं काहुर उठतं; कधी मनातल्या मनात
दोन ओंडक्यांची भेट, क्षणिक जैसी सागरात
सहप्रवासी जाती उतरून, गंतव्य स्थानकात
सोडुनी जाती जैसी संगत, पक्षी एकाच वृक्षाची
वस्ती बदलण्याची कारणं, अनेकविध
माणसांची
सुना झाला कट्टा; सुनी जाहली संध्याकाळ
येईल पुन्हा असेच कोणी; सदाबहार हो काळ
स्वागत आणि निरोप म्हणजे; जणू काही पाठशिवणी
हर्षविषाद नको, स्थितप्रज्ञता असो जीवनी
(कवितेची पार्श्वभूमी….
चेन्नईला रहायला आल्यावर खूप मैत्रिणी मिळाल्या
कट्ट्यावर जमता सगळ्या Evergreen झाल्या
मैत्रिणी बदलल्या काही, एकेक निघून जाता
सदाबहार होऊन कट्टा बहरला, पुन्हा कोणी नवीन येता….
(Evergreen आणि सदाबहार ही कट्ट्याची नावं)
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.