You are currently viewing नाटकाच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून रोटरीच्या इमारतीची डागडुजी – राजेश पनवेलकर

नाटकाच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून रोटरीच्या इमारतीची डागडुजी – राजेश पनवेलकर

नाटकाच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून रोटरीच्या इमारतीची डागडुजी – राजेश पनवेलकर

सावंतवाडीत ९ तारखेला “संगीत संशय कल्लोळ” नाटक रंगणार…

सावंतवाडी

येथील रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीच्या नूतनीकरण व डागडुजी साठी रोटरी क्लब ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी खास “संगीत संशय कल्लोळ” हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून जमा झालेला निधी त्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत रोटरीचे इव्हेंट चेअरमन राजेश पनवेलकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर सद्गुरु संगीत विद्यालय आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून ९ तारखेला रात्री ९ वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै. सभागृहात हे संगीत नाटक आयोजित करण्यात आले आहे. याचा जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सचिव सुनील शेलटकर, सदस्य दिलीप म्हापसेकर, सद्गुरु संगीत विद्यालयाचे निलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पनवेलकर म्हणाले, सध्या दशावतार प्रयोगांचे प्रमाण जास्त असताना, संगीत नाटकं मात्र लोप पावत चालली आहेत. संगीत नाटकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशाने सद्गुरु संगीत विद्यालय आणि रोटरी क्लब यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या संगीत नाटकांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, त्यामुळे या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. या नाटकात सद्गुरु संगीत विद्यालयातील सर्व स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच, नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांना संधी देण्याचा मानसही या आयोजनामागे आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊ साळगावकर हे या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नाट्यप्रेमींनी या संगीत नाटकाचा लाभ घ्यावा आणि या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा