सिंधुदुर्गात पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही
सिंधुदुर्गातील कासार्डे मायनिंग मध्ये गाझापट्टी सारखी स्थिती – पर्यावरण तज्ञ स्टॅलिन दयानंद
सिंधुदुर्ग
कासार्डे मध्ये मायनिंग सुरू आहे ते पाहणी केल्यानंतर जणू काही गाझापट्टी मध्ये गेल्याची स्थिती वाटते. एवढी भयानक स्थिती तेथे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने कासार्डे परिसरात अवैध मायनिंग चे उत्खनन सुरू आहे. बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याने तेथील आसपासच्या शेत जमिनीवर व शेतीवर देखील या अवैध उत्खननाचा परिणाम होणार आहे. तसेच त्या भागात मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण देखील होत असून त्याची देखील पाहणी केली. जलप्रदूषणाचा परिणाम हा त्या आसपासच्या भागावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सर्वाबाबतचे पुरावे तिथून मी गोळा केलेले आहेत. अशी माहिती पर्यावरण वादी चळवळीतील तज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी दिली. कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी श्री स्टॅलिन पुढे म्हणाले या अवैध उत्खननामुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान हे कधीच भरून काढता येणार नाही. याबाबत अधिकारी हे कागदपत्र न पाहता काही होईल ते नंतर पाहू अशी भूमिका घेत सही करतात. जिल्हा खनीकर्म अधिकारी यांनी 2013 पासून कासार्डे मायनिंग मध्ये पाहणी केल्याचा अहवाल नाही. हे प्रकार चालू देणार नाही व हे प्रकार थांबवले जातील असाही इशारा त्यांनी दिला. पर्यावरण पूरक हा विकास झाला पाहिजे. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास होत नाही. मायनिंग हे विकासाचे मॉडेल असता नये असेही त्यांनी सांगितले . सर्वच राजकीय पक्षांना मायनिंगला विरोध नको असतो. मात्र आमचा विरोध हा सरसकट मायनिंगला नसून अनधिकृतपणे चालणाऱ्या व पर्यावरणाच्या ऱ्हास करणाऱ्या मायनिंगला आहे. असेही त्यांनी सांगितले सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून त्यामध्ये अशाप्रकारे अवैध मायनिंग चालवू दिले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लवकरच कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.