नगरपालिकेला आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणार; आमदार नीलेश राणे यांचे प्रतिपादन
मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्र इमारतीचे आम. निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न
मालवण :
मालवण शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचारी वसाहतीच्या रुपाने एक चांगली इमारत उभी राहिली आहे. अशा इमारतींसह भविष्यात उभारण्यात येणाऱ्या इमारतींच्या नियोजनाची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहणार आहे. मालवणातील पर्यटन वाढत असून मालवण शहराची ओळख जागतिक पटलावर होत आहे. त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करणे हे आवश्यकच आहे. त्यादृष्टीने याठिकाणी शासनाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून शहरवासियांबरोबरच पर्यटकांनाही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासाठी नगरपालिकेला आवश्यक असणारा सर्व निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे बोलताना केले.
जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत सुमारे दोन कोटी मंजूर निधीतून उभारणी करण्यात आलेल्या मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी संपन्न झाला. मालवण नगरपरिषद परिसरात अग्निशमन कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज १ (विंग ए) या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्नीशमन केंद्र कार्यालय, स्टोअर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस. तर दुसरा मजला दोन प्रशस्त टू बीएचके रूम (अधिकारी निवासस्थान) असे इमारतीचे स्वरूप आहे. इमारतीचा लोकार्पण आमदार श्री. राणे यांच्याहस्ते झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकारी सोनाली हळदणकर यांनी इमारतीच्या बांधकामासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची इचलकरंजी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बढतीपर बदली झाल्याबद्दल आम. नीलेश राणे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार वर्षा झालटे, मालवण कुडाळ मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, दिपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, पंकज सादये, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संजय पडते, गणेश कुशे, किसन मांजरेकर, पूजा करलकर, आप्पा लुडबे, राजा गावकर, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, ललीत चव्हाण, भाई मांजरेकर, संदीप भोजने, नाना पारकर, मोहन शिरसाट, राजन सरमळकर, राजू बिडये, अंजना सामंत, अभय कदम, परशुराम पाटकर, सोनाली पाटकर, मोहन वराडकर, तारका चव्हाण, मधुरा तुळसकर, अरूण तोडणकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मालवण शहरात गेल्या साडेचार वर्षात करण्यात आलेल्या विकासाकामांची माहिती दिली. तसेच आम. नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावून आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याने नळपाणी योजना, अग्निशमन यंत्रणा, अनेक रस्ते, अनेक ठिकाणची सुशोभिकरण यासारख्या कामांना प्रगती मिळाली आहे. स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि भाजी मार्केट या कामांनाही चालना मिळालेली असून लवकरच सदरची काम सुरू होण्याची शक्यता आहे, असेही सांगितले. तर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालवण शहरात छोटे रस्ते असल्याने काही रस्ते एक मार्गी करावेत, तसेच शहरातील रस्त्यांचे संपूर्ण रुंदीकरण करणे शक्य नसल्याने लोकांशी चर्चा करून जागा उपलब्ध होत असेल तर त्या त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करावे, असे सांगितले.
यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, मालवण शहराला आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. मालवणात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन केले जात आहे. मालवणात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देताना महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन कराबद्दलही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या तसेच पार्किंगची बिकट अवस्था असून त्यावर मार्ग काढण्यासाठी आरटीओ यांच्यासमवेत बैठकही करण्यात आलेली आहे. रिंगरोड संकल्पना राबवून वाहतुकीवर पर्याय लवकरच काढण्यात येणार आहे. शहरवासियांनाही सर्व सुविधा देताना दर्जेदार नगरपालिका निर्माण करण्यात येणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरपालिका अधिकारी सुधाकर पाटकर यांनी केले.