*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*
*माणूस म्हणून जगताना…*
“या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे….”माणूस म्हणून जगताना मला या गाण्याची ओळ प्रथम आठवते. कारण आपल्याला मानव जन्म मिळाला हीच परमेश्वराची आपल्यावर मोठे कृपा आहे.!चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरता फिरता मानव जन्म मिळतो अशी आपल्या हिंदू धर्मातील श्रद्धा आहे आणि असा हा मानव जन्म जगताना आपण तो चांगल्या तऱ्हेने जगला पाहिजे.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे .त्यामुळे तो समाजात रमतो. आपण जिथे जन्माला येतो, ते कुटुंब, आई-वडील, भावंडे एवढेच मर्यादित न ठेवता आपण इतर नातेवाईकांच्या कक्षेतही राहात असतो. ही कक्षा जसजशी वाढत जाते तो क्रम कुटुंब, प्रांत, देश, खंड आणि जगातील माणसांचे वास्तव्य असा वाढत गेला की ‘वसुधैव कुटुंबकम् हा विश्वास वाढतो आणि माणूस म्हणून आपण जगतो!
प्रेम, दया ,परोपकार ,सहकार्य, विश्वास ही पंचसूत्री माणूस म्हणून जगताना आपण लक्षात घेतली पाहिजे. कुटुंबातील सर्वांची एकमेकाविषयी ही तत्वे असतील तर आपोआपच संबंध चांगले राहतात. याच भावना नातेवाईक, शेजारी यांच्याबद्दल असतील तर आपण एकमेकाला संकटात मदत करतो. दुसऱ्याचे काही दोष पदरात घालून आपण चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो.
यावरून मला माझी मुलं लहान असतानाची एक गोष्ट आठवते त्यावेळी यांच्या बदलीचे ठिकाण लांब होते. नातेवाईक मंडळी आमच्यापर्यंत पटकन पोहोचू शकत नसत. तेव्हा माझा मुलगा जेमतेम तीन वर्षाचा आणि मुलगी एक वर्षाची होती. पण
तेथील लोक मुले लहान असताना मला मदत करत असत.माझे मिस्टर डॉक्टर होते. त्यांना दवाखान्याचे काम दिवसभर असे. घराकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळत असे. पण तेथे असणारे सर्व लोक आम्हाला मदत करत असत. मुलांना सांभाळणे, बाहेरून वस्तू आणून देणे, घरातील झाडझूड करणे या सर्व गोष्टी करत असत.सर्वांमध्ये सहकार्याची भावना दिसत असे. माणुसकीचा प्रत्यय अशावेळी नक्कीच येतो. आपल्यालाही दुसऱ्याला मदत करायची प्रेरणा यातून नकळत मिळत असते.
जेव्हा एखाद्या राज्यावर भूकंप पूर अतिवृष्टी अशी काही संकटे येत असतात तेव्हा प्रत्येक जण या गोष्टीचे भान ठेवून परस्परांना मदत करत असतात. आमच्या आठवणीत कोयनेचा, लातूरचा भूकंप, कृष्णेचा पूर, कोकणातील वादळं अशी मोठी संकटे आली, पण माणसाने माणसाशी प्रेम भावाने वागावे याचा चांगला प्रत्यय तेव्हा मिळाला.
आत्ता नुकतेच आपण पहेलगाम हत्याकांडाविषयी वाचत होतो. अतिशय वाईट घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी! त्याचा निषेध देशभर झाला आणि त्यामुळे आपला देश हिंदुत्वावर एकत्रित झाला. ही एकत्रित पणाची भावना माणसाने जगताना ठेवली पाहिजे.
परमेश्वराने इतर प्राण्यांपेक्षा माणसाला बुद्धी जास्त दिली आहे माणसाचा मेंदू हा अतिशय कार्यक्षम असा आहे .त्या खालोखाल माकड, कुत्रा, हत्ती अशा सारख्या प्राण्यांचे नंबर लागतात. या सर्वांपेक्षा माणसाला एक गोष्ट जास्त दिली आहे ती म्हणजे व्यक्त करण्याची सुविधा! माणसाला बोलता येते मेंदू आणि तिथे उमटणारे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेच्या माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकतो. ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. माणूस म्हणून जगताना या गोष्टीचा योग्य तो उपयोग आपण केला तरच आपला मानवी जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल असं मला वाटते!
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

