आर्थिक देवाण-घेवाणीतून सिंधुदुर्गातील १९ ग्रामसेवकांच्या बदल्या
वैभव नाईक आक्रमक; सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात तब्बल ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. यामागे सत्ताधाऱ्यांचा हात आहे, असा आरोप ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. एकीकडे एकाच ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतीचा कारभार आहे. त्याचा फटका लोकांना सहन करावा लागत आहे. मात्र आपले हात ओले करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवकांची आधीच कमतरता असताना कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर सोडले जात आहे. त्यामुळे दोन दोन ग्रामपंचायतचा कारभार एका ग्रामसेवकावर येत असून गावाचे विकास आराखडे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच व सदस्यांना अडथळा ठरत आहे. व्यक्तिशः लाभाच्या योजना देखील ठप्प आहेत. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामपंचायतीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. ग्रामसेवक नसल्याने योग्य माहिती अभावी सरपंच चुकीच्या पद्धतीने कारभार हाताळत असून त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाया होत आहेत. त्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे गरजेचे असताना मात्र सत्ताधारी लोप्रतिनिधी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडून पैसे घेऊन त्यांना हवे त्याठिकाणी बदली मिळवून देत आहेत. आणि त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांना साथ देत आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

