आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा पंचावन्नावा मासिक कार्यक्रम
पुढील वर्षाच्या कार्यक्रमांचे केले नियोजन
वेंगुर्ले
आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या पंचावन्नावा मासिक कार्यक्रम नुकताच आजगाव येथे संपन्न होऊन त्यात जून २०२५ ते मे २०२६ पर्यंतच्या मासिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
आजगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर यांनी ऑक्टोबर,२०१८ मध्ये मांद्रे (गोवा) येथील १९९० सालापासून अखंडित मासिक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘साहित्य संगम’ ची प्रेरणा घेऊन स्थापन केलेल्या साहित्य प्रेरणा कट्ट्याचे आजगाव-शिरोडा पंचक्रोशीत सातत्याने मासिक साहित्यिक कार्यक्रम होत असतात.यंदा प्रथमच वर्षभराच्या मासिक कार्यक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात आले.
यंदाच्या मासिक कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा,प्रेरणा साहित्य संमेलन, मालवणी साहित्य संमेलन,सुप्रसिद्ध ललित लेखक कै.रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ ‘शब्दांचा जादूगार-कै.रवींद्र पिंगे’ हे साहित्यिक प्राचार्य गजानन मांद्रेकर (गोवा) यांचे व्याख्यान,’साहित्य संगम’ (गोवा) च्या सदस्यांसमवेत मालवण येथे साहित्यिक सहली अंतर्गत स्थानिक साहित्यिकांशी वार्तालाप तथा ग्रंथालयास भेट,लेखिका सोनाली परब (गोवा) यांचे कथावाचन,कोजागिरी काव्यसंमेलन, ’संतांचे गूढ अर्थाचे अभंग’ हा ह.भ.प.विष्णूबुवा शेटगांवकर (गोवा) यांचा गायन तथा निरुपणाचा कार्यक्रम अशा विविधांगी कार्यक्रमांचा समावेश आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता होते,तर सुप्रसिद्ध ललित लेखक कै.रवींद्र पिंगे यांची जन्मशताब्दी गेल्या मार्चमध्ये सुरू झाली आहे.हे औचित्य साधून ‘जन्मशताब्दी:एक सरायला आली…दुसरी सुरू झाली…’ हा कार्यक्रम मांद्रे,गोवा येथील ‘साहित्य संगम’ च्या संयुक्त विद्यमाने दि.२९ जून रोजी पालये (गोवा) येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात ‘जयवंत दळवी समजून घेताना’ या विषयावर पुरुषोत्तम तथा सचिन दळवी व विनय सौदागर बोलणार आहेत,तर ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.रवींद्र पिंगे यांचे ललित लेखन’ या विषयावर गजानन मांद्रेकर बोलणार आहेत.
या व्यतिरिक्त दोन ‘पुस्तकचर्चा’ कार्यक्रमांत सरोज रेडकर,नीलम कांबळे,सोमा गावडे,स्नेहा नारिंगणेकर,शेखर पणशीकर,प्राची पालयेकर, वैभवी राय शिरोडकर व डॉ.गणेश मर्ढेकर हे सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकांवर विवेचन करतील. वर्षभराचे मासिक कार्यक्रम शिरोडा येथील खटखटे ग्रंथालय, साळगावकर मंगल कार्यालय, फणसखोल येथील श्रीगणेश मंदिर,आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य दिलीप पांढरे यांचे निवासस्थान, कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांचे निवासस्थान, तसेच सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. या वार्षिक नियोजन बैठकीस मांद्रे,गोवा येथील ‘साहित्य संगम’ चे कार्यवाह प्रा.गजानन मांद्रेकर व साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी मार्गदर्शन केले.खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, कार्यकारिणी सदस्य सचिन दळवी,कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्य सरोज रेडकर,एकनाथ शेटकर, निवृत्त शिक्षक विनायक उमर्ये,सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरे,लेखिका स्नेहा नारिंगणेकर व पुस्तकप्रेमी जयदीप देशपांडे हे उपस्थित होते.



