मालवण :
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर पडवे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मालवण देऊळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमित इब्रामपुरकर यांनी मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे दहावीपर्यंतचे तर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. त्यानंतर मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊन पदवी घेतली. तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे अमित इब्रामपूरकर हे त्यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बनले. अमित इब्रामपूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना अनेक आंदोलने उभारली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अमित इब्रामपूरकर यांच्यावर मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. इब्रानपूरकर यांनी मराठीच्या मुद्द्याबरोबरच परप्रांतीय फळ विक्रेते त्या काळात मालवणात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामानबाबत स्पॉट पंचनामा करत नगरपालिका प्रशासनाला हादरवून सोडले होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना पक्षाच्यावतीने प्रसंगी स्वखर्चाने सढळ हस्ते मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
शासकीय ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या अमित इब्रामपूरकर यांचे इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रभुत्व होते. मालवण तालुका सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या सहखजिनदार पदावर ते कार्यरत होते ते अविवाहित होते. आज सकाळी रे उतारे मालवण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, भाऊजी, पुतणी भाची अशा परिवार आहे. मालवण पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक श्रीकृष्ण इब्रामपूरकर यांचे ते सुपुत्र होत.

