वैभववाडीत करुळ येथे अतिवृष्टीने वासुदेव सुतार यांचे कोसळले घर
वैभववाडी ते करुळ महामार्ग चिखलमय
वैभववाडी
वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. करुळ जामदारवाडी येथील वासुदेव सुतार यांचे घर पावसात कोसळले आहे. यात सुतार यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत होते. महामार्ग रुंदीकरणचे काम सुरू असल्यामुळे वैभववाडी ते करुळ रस्ता चिखलमय झाला आहे.
गेले तीन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीत करुळ व भुईबावडा घाटातून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. करुळ जामदारवाडी येथील वासुदेव सुतार यांच्या घराच्या दोन्ही पडव्या कोसळल्या आहेत. तलाठी श्री रामोड यांनी कोसळलेल्या घराचा पंचनामा केला आहे. वासुदेव सुतार हे वयोवृद्ध असून आजाराने त्रस्त आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. सुतार यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
अतिवृष्टीत अनेक ठिकाणी काॅजवे पाण्याखाली गेल्यामुळे गावातील वाड्यांचा संपर्क तुटला आहे. वैभववाडी शहरात सुख नदी ते शांती नदी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संभाजी चौकात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. नगरपंचायतीने बांधलेल्या गटारातून पाणी जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

