कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची निवड
सिंधुदुर्ग
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची निवड यादी महाडी.बी.टी. पोर्टलवर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांमधून राज्यस्तरावर एकूण १,५२,१४३ शेतकरी निवड केले असून निवड केलेल्या घटकांची रक्कम सुमारे रु. ८४० कोटी आहे. सदरची यादी महाडी.बी.टी. पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे. याबाबत निवड झालेल्या १ कोटी ५२ लक्ष शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्याची यादी दिनांक 21 मे 2025 रोजी खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन, उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास आणि मुख्यमंत्री, यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली.
यादी डी.बी.टी. पोर्टल, कृषि विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषि विभागाच्या क्षेत्रिय अधिकारी यांच्या लॉग ईन वर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी लगेचच पूर्व संमती मिळेल. पात्र लाभार्थ्यांकडून येत्या 10 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास तो अर्ज आपोआप रद्द होईल.
महाडी.बी.टी. पोर्टलवर फार्मर आयडी च्या आधारे लॉग इन केल्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत माहिती मिळू शकेल. फार्मर आयडी काढला नसल्यास नजीकच्या सी.एस.सी. केंदाकडून तो काढून घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण 905 शेतकऱ्यांची कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी निवड झालेल असून मंजूर अनुदानाची रक्कम रु. 328.20 लाख आहे.

