“बायना का आयना, ढासळलेल्या सामाजिक मुल्यांचा आयना”….
… अॅड. नकुल पार्सेकर…
आज सावंतवाडीत सिमेन्स सांस्कृतिक संस्था मुंबई निर्मित वास्को गोवा येथील बायना येथील वर्षानुवर्षे चालत होता अशा वेश्याव्यवसायावर आणि या व्यवसायात नरकयातना भोगणाऱ्या वेश्यांच्या वेदनामय कथा आणि व्यथा मांडणारा अतिशय सुंदर दोन अंकी नाट्यप्रयोग पहायला मिळाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक मनाचे डॉ. असलेले, सामाजिक भान जपणारे, सामाजिक पर्यावरण जपण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमचे परममित्र डॉ. रूपेश पाटकर यांच्या “अर्ज मधील दिवस” या पुस्तकावर आधारित या नाटकाची संहिता लिहिली आहे कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र श्री महेश सावंत पटेल यांनी. तेवढ्याच ताकदीने त्यानीच दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. तब्बल चाळीस कलाकारांचा संच ज्यामध्ये पंधरा वर्षांच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या आजीचा पण सहभाग आहे. अप्रतिम टिम वर्क आणि सादरीकरण.. अडिच तास खुर्चीला खिळवून ठेवणारी अप्रतिम नाट्य कलाकृती.
मुंबईतील कामाठीपुरा, पुण्यातील बुधवार पेठ, पश्चिम बंगाल मधील रेड लाईट एरिया आणि गोव्यातील बायना या ठिकाणच्या कुंटणखान्यात नरक यातना भोगणाऱ्या कोवळ्या मुलीचे उध्वस्त होणारे आयुष्य या नाटकात अधोरेखित केलेले आहे. या कुंटणखान्यात काही फसवून आणलेल्या, काही परिस्थितीच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकलेल्या स्रियांचा आक्रोश आणि वेदना स्तब्ध करणाऱ्या आहेत. ज्यांची मुले मोठी होतात.. तेव्हा त्यांच्याकडे हा रंडीचा मुलगा किंवा मुलगी म्हणून बोट दाखवून अवहेलना केली जाते तेव्हा त्या मातेला ते सहन होत नाही. देवदासी या प्रथेवरही या नाटकात प्रहार करण्यात आलेला आहे.
वास्को बायना येथील वस्ती काही वर्षापूर्वी पाडण्यात आली पण या वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या शेकडो स्ञिया उघड्यावर पडल्या. नेहमी प्रमाणे पोलीस बळाचा वापर करून ही वस्ती जमीनदोस्त केली मात्र अशावेळी त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी अर्ज या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन त्यांचे नुसते पुनर्वसनच केले नाही तर त्याना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर केले. कुंटणखान्यातून बाहेर काढले. परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन मोठ्या पगाराच्या नोकरीचे अमीष दाखवून कुंटणखान्यात रवाना केलेली तरुणी, नवऱ्याच्या मारहाणीला आणि ञासाला कंटाळून घर सोडणाऱ्या महिलेचा गैरफायदा घेऊन तिला दहा हजारात कुंटणखाना चालवणाऱ्या बाईला विकली जाते तेथून आपली सुटका करण्यासाठी धडपडते.अशावेळी एक दलाल तिची सुटका करण्यासाठी तिच्याशी लग्न करण्याचे अमीष दाखवून फसवतो व त्याच महिलेला दुसऱ्या कुंटणखान्यात तीस हजाराना विकतो हे विदारक सत्य जेव्हा तिला समजते त्यावेळचा तिचा आक्रोश प्रेक्षकांचे काळीज फाटणारा आहे. स्वच्छता कामगारांच्या प्रश्नांवरही या नाटकांत प्रकाशझोत टाकणारा असून एक सामाजिक विषयावर प्रबोधन करणारे हे नाटक आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंञी मा. आशिशजी शेलार यांनी आपल्या सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून याचे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या नाटकाची संहिता लिहिणारे व दिग्दर्शन करणारे श्री सावंत पटेल हे माजी आमदार प्रमोद जठार यांच्याच शिरवल गावचे असून त्यात जठारानी विशेष लक्ष घालायला हरकत नाही.
व्यवसायिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकापेक्षा काकणभर जास्तच प्रभावीपणे अतिशय सामान्य कलाकाराने हे नाटक तेवढ्याच ताकदीने सादर केलेले आहे. नाटक संपल्यावर या सर्व कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली..
