उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कुडाळ
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रफुल्ल माळी (सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मत्स्य वैज्ञानिक डॉ. नितीन सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी., एच.एस.सी., शिष्यवृत्ती परीक्षा व इतर शैक्षणिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून, त्यांच्या यशाचा गौरव महाविद्यालयात करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमामध्ये गुणवंत पाल्यांना पुष्प व महाविद्यालयाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात आत्मीयता, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा भाव दिसून आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. माळी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे एक कुटुंब म्हणून एकत्र येणे, ही संस्कृती जपण्याची गरज व्यक्त केली. पाल्यांनी यशाचे शिखर गाठावे आणि आपल्या कुटुंबाचा व महाविद्यालयाचा अभिमान वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.
