*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*
*इतिहासाचा अभ्यास करताना*
आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे की अनेक भारतीय राजे युद्धात जिंकायचे पण तहात हरायचे किंवा युद्धात पराभव दिसत असल्यास यशस्वी माघार कशी घ्यावी याची कोणतीही योजना त्यांनी अखल्याचे दिसत नाही. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे कधीच घडले नाही. त्यांनी आखलेल्या प्रत्येक योजनेत जर आपला पराभव होणार असेल किंवा काही दगा- फटका झालाच तर पुढे काय करायचे याचा विचार व तशा सूचना त्यांनी आपल्या सर्वच महत्त्वाच्या सहकाऱ्यांना दिलेल्या असे. अफजलखानाचा वध व आग्र्याहून सुटका यासारख्या अनेक प्रसंगांमध्ये याबद्दलचे स्पष्ट पुरावे मिळतात. बादशाहकडून आपल्याला अटक होईलच हे आधी माहीत नसतानाही अटक झालीच तर बाहेर कसं पडायचं आणि कशाप्रकारे महाराष्ट्रात परत यायचं याबद्दलचं आधीच नियोजन केलेलं असल्याचं आपल्याला अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांवरून दिसून येतं. अफजलखानाच्या भेटीस जातांना सुद्धा काही विपरीत घडले तर पुढे काय करावे याबद्दलच्या सर्व सूचना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच्या काळकोठडीतून स्वतःची सुटका कशी करून घेतली, हा एक खूप कठीण प्रसंग होता. याबद्दल आज उपलब्ध माहितीनुसार ही एक घटना महाराजांच्या कार्य कौशल्याची, दृष्टिकोनाची, योग्य निर्णय क्षमतेची, माणसं जोडण्याच्या प्रक्रियेची, आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याची, त्यांना आपलंसं करण्याची, अगदी यातून दिल्लीचा बादशाह औरंगजेब हा सुद्धा सुटला नाही याची आपल्याला सतत जाणीव होत राहते, पहारेकरी वर्ग, त्याचे प्रमुख, बादशाहच्या दरबारातील दरबारी मंडळी व स्वतः बादशाह या सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा अनावधानाने मिळालेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असेल आणि असे हे सहकार्य मिळवण्यात आपल्या बुद्धीचातुर्याने यशस्वी झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण उदाहरण असल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. बादशाहने महाराजांना जेव्हा काळ कोठडीत बंद केले आणि त्यानंतर छत्रपतींनी जो विचार केला, तो ज्या पद्धतीने केला- ‘बालपणी आपल्या आईकडून ऐकलेल्या रामायण- महाभारतातील गोष्टींचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला येऊ शकेल. महाभारतातील एका प्रसंगात अशाच प्रकारे लाक्षागृहामध्ये पांडवांना मारण्याचा जो एक अघोरी डाव रचला होता. त्यातून पांडव कसे बाहेर पडले याची काहीशी आठवण महाराजांच्या या आग्रा सुटकेतून दिसून येते. वर्तमानातील समस्यांचा सामना करताना भूतकालीन घटनांचा कसा उपयोग करायचा असतो, इतिहासातून नेमके काय आणि कसे शिकावे ही जी नवी दृष्टी आपल्याला महाराजांनी शिकवली, त्याचा खऱ्या अर्थाने आज आपण स्वीकार करण्याची गरज आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आपण आपली दृष्टी कशी ठेवली पाहिजे याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे.
पण आम्हीं इतिहासापासून काहीच शिकत नाही, उलट तो सतत आपण विसरताना दिसतो किंवा तो जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची आपली मानसिकता नसते. त्यामुळेच इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा- पुन्हा होताना दिसतात. याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. तशीच ती वर्तमानतही दिसतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुहम्मद घोरिला युद्धात अनेक वेळा पराभूत केले होते. प्रत्येक वेळी त्याला शरण आला किंवा दयेची याचना केली म्हणून सोडून दिले किंवा त्याला पळून जाऊ दिले. आपण परकीय अक्रमकांवर पराभूत केल्यावर अन्याय, अत्याचारही नाही केला. तोच मुहम्मद घोरी जेंव्हा पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करतो व पकडतो तेव्हा तो त्यांना सोडत नाही. त्यानंतर दक्षिण भारतातील समृद्ध अशा विजयनगरच्या साम्राज्यानेही बहामणी राजांना अनेक वेळा पराभूत केले होते. पण जेव्हा 1565 च्या तालिकोटच्या युद्धात बहामनींचा विजय होतो तेव्हा ते पुढील सहा महिने विजयनगरची भयंकर लूट करतात ती इतकी असते की पुढे त्या प्रदेशाचे जंगलात रूपांतर होते. अगदी अलीकडच्या कालखंडात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनेक युद्धे झालीत. त्या युद्धांचा जरी आपण अभ्यास केला तर तिथे ज्या प्रकारे युद्धानंतर करार करण्यात आले त्या करारांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. अमेरिका-इराक युद्ध, शीतयुद्ध. कारण गेल्या सात दशकांमध्ये आपण पाकिस्तानला अनेक वेळा पराभूत केले व करार करून युद्ध थांबवले. पकडलेले सैनिकही सोडून दिले. पण कल्पना करा की जेव्हा आपल्या दुर्दैवाने एखाद्या युद्धात पाकिस्तानचा विजय झाला तर तो आपल्याशी याच प्रकारे वर्तन करेल याची खात्री देता येईल का? आपली इतिहास न अभ्यासण्याची व इतिहासाच्या अभ्यासातून योग्य बोध न घेण्याची दृष्टी दिसते.
धन्यवाद.
लेखक प्रा.प्रशांत शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली. prashantshirude1674@gmail.com
9967817876

