थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या रु. 1 लाख थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यावस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (विरशैव लिंगायत समाजाकरीता), संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाजाकरीता) , संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाजाकरीता) व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( उर्वरीत ओबीसी समाजाकरीता ) या महामंडळांच्या योजनेअंतर्गत थेट कर्ज योजना रूपये 1,00,000/- लक्ष पर्यंत ही योजना सुरू असून सन 2025-2026 या वर्षाकरीता उमेदवारांना अर्ज सादर करावेत.
योजनेचे स्वरूप
महामंडळामार्फत राबविण्यात येणारी थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रक्कम रूपये 1,00,000/- पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा नियमित 48 महिने ( 4 वर्षे ) इतका असून रूपये 2,085/- या मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे. नियमित हप्त्यांची परतफेड करण्याऱ्या लाभार्थीना शुन्य टक्के व्याज दर लागू राहील. परंतू लाभार्थीने कर्जाची परतफेड नियमित दरमहा न केल्यास थकीत हप्त्यांवरील रकमेवर द.शा.द.शे. 4% प्रमाणे व्याज आकारण्यात येईल.
कर्ज योजनेमधून करता येऊ शकणारे व्यवसाय
महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या सहाय्याने अर्जदार मत्स्य व्यवसाय, कृषि क्लिनिक, सायबर कॅपे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स सेंटर, ब्युटी पार्लर,मसाला उद्योग, पापड उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र , चहा विक्री केंद्र, हॉटेल,गॅरेज, इलेक्ट्रिकल शॉप,मोबाईल रिपेरींग व्यवसाय, किराणा दुकान,कृषी संलग्न व्यवसाय इत्यादी किंवा कायदेशीररित्या सुरू करता येऊ शकणारा कोणताही व्यवसायकरीता अर्जदार अर्ज सादर करू शकतो.
लाभार्थी पात्रतेचे निकष –
अर्जदार हा इतर मागासप्रवर्गातील असावा. अर्जदाराकडे तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झालेला ओबीसी प्रवर्गाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय हे 18 ते 55 वर्षे पर्यंत असावे. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू.1 लाखापेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र ( तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला ), महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (वय अधिवास प्रमाणपत्र) ,अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड , वयाचा पुरावा, व्यवसायाबाबत आवश्यक असलेले कागदपत्रे इ. तसेच महामंडळाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे. जिल्हा कार्यालयाकडे कर्ज अर्जासोबत सादर करावी. या योजनेचे कर्ज अर्ज जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध आहेत.
कर्ज रक्कमेचे वाटप
योजनेतील कर्जाचे वाटप महामंडळाकडून होणार असून पहिला हप्ता (75 टक्के) वाटपकरण्यात येईल व दुसरा हप्ता (25टक्के) प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर लाभार्थीच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
योजनेमध्ये लाभार्थीला कर्ज वाटप करतेवेळी महामंडळाला आवश्यक असणाऱ्या वैधानिक कागदपत्रांतील अटी व शर्तींमध्ये काही प्रमाणात शिथीलता करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थीच्या नावे असणारा घरपत्रक उतारा (नमुना 8अ) , किंवा शेतजमीन(7/12) यावर महामंडळाचा बोजानोंद करून मिळकतीचे मुल्यांकन सादर केल्यास या योजनेचा लाभ घेता येईल किंवा एक जामीनदार शासकीय कार्यालयातील कायमस्वरूपी कर्मचारी असावा व शासकीय सेवा किमान 05 वर्षे शिल्लक असणे आवश्यक आहे.
योजनेकरीता जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करावे व योजनेचा लाभ घ्यावा याकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे अर्ज उपलब्ध आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्गनगरी ,ओरोस, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग याठिकाणी भेट देवून अथवा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362 228119 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
०००००
