वेंगुर्लेत २५ मे रोजी भव्य मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन
वेंगुर्ले
श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राम्हण युवक मंडळ, पूर्णांनंद सेवा समितीचे यांच्यावतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ले येथे २५ मे रोजी भव्य मोफत बहुद्देशिय वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात वेंगुर्ले शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व फोंडा गोवा येथील उद्योजक वि.तू. प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच या शिबिराला विषेश अतिथी म्ह्णून माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर, आमदार किरण सामंत, उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, जिजामाता पूरस्कार विजेत्या स्वरूपा रवींद्र सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सावंत, तालुका वैयकीय अधिकारी यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.
डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलची डॉक्टरची टीम या शिबिरात तपासणी करणार आहे. गोरगरीब जनतेला दरवर्षी या न्याती मार्फत मोफत शिबीर घेतो. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त जनतेने या शिबिराचा लाभ घेण्याच्या उद्देशाने या शिबिराची पत्रके तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात देण्यात आली आहेत. ग्रामीण भागाच्या ठिकाणी ३० ते ४० नागरिक जमल्यास वाहनाची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहेत. अशी माहिती सचिन वालावलकर यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ उल्हास तेंडुलकर म्हणाले, या शिबिरामध्ये नेत्रविकार तपासणी, स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, बालरोग तपासणी व मार्गदर्शन, कर्करोग तपासणी, नाक- कान-घसा तपासणी, ऍक्युप्रेशर तज्ज्ञांनद्वारे उपचार व मार्गदर्शन, त्वचारोग तपासणी, चेस्ट फिजिशियन, फिजिओथेरपी (डायथर्मी) उपचार, हृदयविकार तपासणी, दंत चिकित्सा, रक्त तपासणी, पी.एफ.टी., नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप, अस्थीरोग चिकित्सा आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या शिबिरात मुंबई व डेरवण येथील तज्ञ डॉक्टर्स द्वारे रुग्ण तपासणी करण्यात येणार असून यात जनरल सर्जन डॉ. अंकिता हुले, जनरल मेडिसिन डॉ. राज देसाई, ऑप्थल डॉ. रिया साळुंके, गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. निहारिका राहुल, ऑप्थोपेडिक डॉ. अपूर्वा दुबे, इएनटी डॉ प्रतीक शहाणे यांचा समावेश आहे.
या शिबीरात मोफत औषधे व गोळ्या, मोफत चष्मा देण्यात येणार आहेत. दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव बनवण्यासाठी या शिबिरात माप घेण्यात येणार असून त्यांच्या घरी येऊन त्यांना ते बसवणार आहोत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महालॅब मार्फत सर्व रक्त, लघवी तपासण्या सुद्धा मोफत होणार असल्याची माहिती डॉ तेंडुलकर यांनी दिली. यावेळी उपस्थित वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र लिलजे यांनीही नागरिकांना आवाहन केले. यावेळी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, पूर्णांनंद सेवा समिती अध्यक्ष तथा कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राम्हण युवक मंडळ अध्यक्ष योगेश सामंत आदी उपस्थित होते.
