You are currently viewing महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई, अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग जबाबदार

महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई, अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग जबाबदार

*महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई, अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग जबाबदार*

*जिल्ह्यातील नेत्यांचा अक्षम्य दुर्लक्ष वीज यंत्रणेच्या डबघाईस कारणीभूत*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस काही ठिकाणी वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परंतु याच दरम्यान नेहमीप्रमाणे “पादऱ्याक पावट्याचा निमित्त” या म्हणीप्रमाणे निद्रिस्त असलेल्या जिल्ह्यातील महावितरण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मुळातच मोडकळीस आलेले महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्टर कोलमडून पडले आणि संपूर्ण जिल्हा काही ठिकाणी ७/८ तास ते जवळपास ४८ तासांपर्यंत अंधारात पडला आहे. मालवण सारखा तालुका सुद्धा २४ तासांपेक्षा जास्त काळ अंधारात चाचपडत होता. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरणला वारंवार दिलेल्या निवेदन आणि सूचना नंतरही जिल्ह्यातील महावितरणच्या अकार्यक्षम अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने आज जिल्ह्यात वीज ग्राहक, व्यापारी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या या अकार्यक्षमतेला आणि जिल्हावासियांना अंधारात राहण्या करिता जेवढे महावितरणचे अधिकारी, अकुशल कर्मचारी जबाबदार आहेत तेवढेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नेते मंडळी देखील जबाबदार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मंत्री, नेते, आमदार आदींना निवेदन देऊन जिल्ह्यातील महावितरणच्या कारभाराची माहिती आणि जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. प्रत्येकवेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ या दोन्ही विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना भेटून पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने करण्याबाबत निवेदन देऊन सूचना केल्या होत्या. केंद्रीय मंत्री नाम.श्रीपाद नाईक यांच्याकडेही संघटनेने भेटून जिल्ह्यातील वीज समस्या मांडल्या होत्या. परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अधिकारी वर्गावर वचक नसल्याने अधिकारी जिल्हावासियांना जुमानत नाहीत. नाकर्ते अधिकारी सहा सहा वर्षे जिल्ह्यात टिकतात आणि चांगले अधिकारी सहा महिन्यात बदली करून जातात. जिल्ह्यातील महावितरणच्या अंधाधुंद कारभारामुळे दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरे, अनेक गावे आठ आठ दिवस अंधारात राहतात हे जिल्हावासियांचे दुर्दैव आहे. पहिल्याच पावसात जिल्ह्यातील महावितरणचे वीज खांब अक्षरशः कोलमडून पडतात, झाडांच्या फांद्या पडून वीज तारांचे नुकसान होते. यासाठीच महावितरणला झाडे कटिंग करून घेण्यासाठी वीज ग्राहक संघटना गेले चार महिने मागे लागली आहे. परंतु “आमच्याकडे माणसे नाहीत, तुम्हीच माणसे द्या” अशी अधिकाऱ्यांची उत्तरे असल्याने जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होतोच पण महावितरणचे देखील नुकसान होते जे अखेर ग्राहकांच्याच माथी मारले जाते.
जिल्ह्यातील वीज ग्राहक देखील आठ महिने सुशेगाद असतात आणि पावसाळा सुरू झाला की ओरड मारायला सुरुवात करतात. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी आता जागृत होण्याची, अखंडित वीज पूरवठा हा आपला हक्क आहे आणि तो मिळविण्यासाठी पेटून उठण्याची गरज आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागेवर बसू द्यायचे नाही, सरकारी फोन वापरून वारंवार फोन बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. तरच जिल्ह्याची वीज यंत्रणा काही अंशी सुधारेल.
जिल्ह्यातील महावितरण सुस्थितीत येण्यासाठी वीज ग्राहकांची मानसिकता बदलली पाहिजे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नेत्यांना जिल्हावासियांनी जाब विचारला पाहिजे. कारण जिल्ह्याचे वीज वितरणाचे इन्फ्रास्ट्रक्टर कमकुवत असल्याने आणि पावसाळ्यात कोकणात झाडे पडून वीज वाहिन्या, खांबांचे होणारे नुकसान व ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता जिल्ह्याला भूमिगत वीज वाहिन्यांची नितांत गरज असल्याचे लक्षात येते. जिल्ह्यातील इन्फ्रास्ट्रक्टर मजबूत करण्यासाठी नेत्यांनी, मंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा जिल्ह्यातील वीज यंत्रणा दरवर्षी पावसाळ्यात ओरड मारण्यापुरती राहणार हे निश्चित आहे. जर अशी परिस्थिती नको असेल तर जिल्ह्यातील वीज वितरणाच्या कारभाराबद्दल नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु जिल्ह्यातील नेत्यांना कोणीही प्रश्न विचारत नाहीत कारण अनेकांच्या माथी निवडणुकीत विकले गेल्याची लेबलं लागली आहेत. त्यामुळे जिल्हा आज वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महावितरणचे अधिकारी काहीजण तक्रार ऐकून घेतात परंतु कार्यवाही शून्य होते. त्यांचीच अवस्था भेदरल्यासारखी झाली आहे. कोकणात मूळ कोकणातील अधिकारी क्वचितच दिसतात, वरच्या पट्ट्यातील अधिकाऱ्यांना कोकणातील पावसाची माहितीच नसते त्यामुळे ते उन्हाळ्यात निर्धास्त राहतात आणि पावसाळ्यात फोन बंद करून लपून बसतात.
तत्कालीन अधीक्षक अभियंता पाटील यांनी सागरी किनाऱ्या लगतच्या वेंगुर्ला, मालवण, देवगड आदि तालुक्यांसाठी भूमिगत वीज वाहिन्या मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आलेले अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी देखील सदरच्या वीज वाहिन्या मंजूर झालेल्या असून लवकरच त्याचे टेंडर निघून काम सुरू होणार अशी ग्वाही दिली होती. परंतु गेल्या सहा महिन्यात देवगड मधील काही भाग वगळता इतरत्र भूमिगत वीज वाहिन्यांचे काम होताना दिसले नाही. खरेतर कोकणावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि भौगोलिक परिस्थिती पाहता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूमिगत वीज वाहिन्या करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा दरवर्षी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पावसाळ्यात अंधारात राहणार आणि अधिकारी, नेत्यांच्या नावाने जनता फक्त ओरडत बसणार याखेरीज वेगळे काहीही होणार नाही.

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*शुभांजीत ‌सृष्टी होम स्टे*

*राहण्याची व जेवणाची उत्तम सोय*

*संपर्क*
*अजित नाडकर्णी*
*9422373327*
*फोंडाघाट*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/171092/

https://www.facebook.com/share/p/15v1oKFv6c/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा