You are currently viewing मान्सून पूर्व पावसाचा सावंतवाडी ताल्युक्यात मोठा तडाखा

मान्सून पूर्व पावसाचा सावंतवाडी ताल्युक्यात मोठा तडाखा

वीज वितरण कंपनीला मान्सून पूर्व पावसाचा सावंतवाडीत ताल्युक्यात मोठा तडाखा

वीज वितरण कंपनीला सात ते आठ लाखांचा फटका

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात मंगळवारी दुपारपासून कोसळत असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन पुरते विस्कळीत केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसला असून, झाडे कोसळून विद्युत खांब आणि तारा तुटल्याने सुमारे सात ते आठ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. 

मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने तालुक्यात अक्षरशः हाहाकार उडवला. शेतकरी, बागायतदार, व्यापारी वर्ग आणि अन्य यंत्रणांनाही या पावसाचा फटका बसला, मात्र वीज वितरण कंपनीला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले. सावंतवाडी शहरात नुकसानीचा आकडा मोठा आहे. भटवाडी येथे आंब्याचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळल्याने तब्बल सात खांब कोसळले. तसेच, माठेवाडा भागात पाच एलपी खांब आणि एक डीपी (Distribution Transformer) चेही नुकसान झाले. शहरातील नुकसानीचा आकडा पाच लाखांहून अधिक आहे. यामुळे सावंतवाडी शहरातील विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. रात्री उशिरा वीज वितरण कंपनीला शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र, ग्रामीण भागातील वीजपुरवठा आज दुसऱ्या दिवशीही खंडित आहे.

ग्रामीण भागातही वीज वितरण कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. बांदा शहरात तीन खांब तर वाफोलीमध्ये एक व कोलगावात दोन खांब तुटून पडले. यामुळे संपूर्ण तालुक्यात साधारणतः सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, पहिल्याच पावसात वीज वितरणच्या कारभाराची पोलखोल झाल्याचे चित्र आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले, कारण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले होते. ठिकठिकाणी मुख्य वाहिनीवर बिघाड (फॉल्ट) झाल्याने तो सुरळीत करण्यास अडचणी येत असल्याचे वीज वितरणचे उपअभियंता शैलेश राक्षे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील काही गावांचा विद्युत पुरवठा आज दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुरळीत झाला नाही. पावसाची रिपरिप सुरुच असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यात अडचणी येत होत्या. एकूणच, वीज वितरणच्या या कारभाराबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा