कणकवली
विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न केंद्रशाळा शेर्पे तालुका कणकवली या शाळेत सन 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रम रवींद्र जठार सभापती वित्त व बांधकाम सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली व तृप्ती माळवदे सदस्य पंचायत समिती कणकवली, निशा गुरव सरपंच ग्रामपंचायत शेर्पे, सुभाष शेलार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, विलास पांचाळ उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दशरथ शिंगारे मुख्याध्यापक केंद्रशाळा शेर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आला . या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रिद्धी राजू गर्जे हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पाचव्या क्रमांकाने व कणकवली तालुक्यात पहिल्या क्रमांकाने शिष्यवृत्ती पात्र झाली. त्याबद्दल तिचा शाळेच्या व ग्रामपंचायत शेर्पेच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गुणगौरव रविंद्र जठार सभापती वित्त व बांधकाम सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी राहुल पांचाळ, साईराज शेलार, राज तेली ,कोमल शेलार, वैष्णवी शेलार, यश चव्हाण यांचाही गौरव करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये इयत्ता चौथीतील तालुका गुणवत्ता यादी मधील गुणवंत विद्यार्थी अथर्व सत्यविजय सावंत,चिन्मय दशरथ शिंगारे, जय सुभाष देवधर या विद्यार्थ्यांचाही शाळेच्या व ग्रामपंचायत शेर्पेच्या वतीने भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .त्याच वेळी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, अमोल भंडारी, राजू गर्जे यांचाही श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रवींद्र जठार म्हणाले केंद्रशाळा शेर्पे मध्ये स्पर्धा परीक्षा उपक्रमाची तयारी चांगल्या प्रकारे आणि नियमित सुरू असल्यामुळे शेर्पे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत होत आहेत. हे या गावातील कार्यरत शिक्षक व पालक यांच्या कार्याचा सन्मान आहे. तसेच अजूनही चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शिक्षक व पालकांनी एकत्र येऊन नियोजन करा, आणि हा यशाचा आलेख चढता ठेवा. व शेर्पे गावाचा सर्वांनी नावलौकिक वाढवा अशी अपेक्षा व्यक्त केली .लोकप्रतिनिधी म्हणून लागणारे सहकार्य माझ्याकडून या शाळेसाठी 100% मिळेल. आपण काम करत राहा मी आपल्या सोबत राहीन. अशा प्रकारची ग्वाही दिली. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे खास अभिनंदन केले. त्याचप्रमाणे तृप्ती माळवदे सदस्य पंचायत समिती कणकवली, निशा गुरव सरपंच ग्रामपंचायत शेर्पे , सद्गुरु कुबल केंद्रप्रमुख शेर्पे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार श्री दशरथ शिंगारे मुख्याध्यापक यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल भंडारी यांनी केले. सदर कार्यक्रमास सरिता पवार सरपंच ग्रामपंचायत कुरगंवणे /बेर्ले, सर्व ग्रामपंचायत सदस्य शेर्पे, विनोद शेलार पोलीस पाटील शेर्पे, माने ग्रामसेवक शेर्पे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक संघ सदस्य, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच ग्रामपंचायत शेर्पे, शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा शेर्पे, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे योगदान लाभले.