कणकवली
मी राणेंच्या स्वाभिमान पक्षातून नगराध्यक्ष झालो. राणे जिथे जातील तिथे मी असणार. मी कट्टर राणे समर्थक आहे असे रोखठोक ठणकावत शिवसेना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी आपले दरवाजे बंद करावेत असे सुचकपणे सांगत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपण राणेंसोबतच राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नगराध्यक्ष नलावडे यांनी भाजी मार्केटप्रश्नी दडपण, दबाव घेऊ नये. नलावडे याना शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगत नाईक यांनी नगराध्यक्ष नलावडे याना शिवसेना प्रवेशाची खुली ऑफर दिली होती. नाईक यांच्या शिवसेनाप्रवेशाच्या ऑफरची खिल्ली उडवताना हा सुशांत नाईक यांचा स्वतःचे राजकीय वजन वाढविण्याचा बालिश प्रयत्न असल्याचेही नलावडे म्हणाले. माझ्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा नाईक यांचा डाव आहे. उलट सुशांत नाईक यांनी आपली व्यावसायिक भूमिका जाहीर करावी असावं आव्हान नलावडे यांनी दिले. भाजी मार्केट आरक्षण स्वतः डेव्हलप करण्याच्या बाता करण्यापेक्षा राज्यात सत्ताधारी असलेल्या नाईक यांनी पालकमंत्र्यांकडून निधी आणावा असा सल्लाही नलावडे यांनी दिला.
४ जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत बैठकीत भाजी मार्केटबाबत मी भूमिका जाहीर केली आहे. राजन तेली हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तर मी भाजपाचा नगराध्यक्ष आहे. कणकवली वासीयांच्या हितासाठी मी भाजी मार्केटबाबत माझ्या भूमिकेशी ठाम राहणार आहे. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी ग्लोबल असोसिइट्स ने नगरपंचायत ची फसवणूक केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल केल्यास शहरवासीयांच्या हितासाठी सीईओं च्या पाठीशी राहणार असल्याचेही नलावडे म्हणाले.