“संग्रामजी रिअली प्राऊड आॅफ यू”
…. Adv. Nakul Parsekar..
अमरावतीचे सुपूञ आदरणीय भूषण
गवई साहेबांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. देशभरातील त्यांचे न्यायिक क्षेत्रात काम करणारे असंख्य मिञ या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. दिल्लीतील या सोहळ्यात टीव्ही चॅनेलच्या पडद्यावर एक ओझरता चेहरा मला दिसला. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर देशाच्या आर्थिक राजधानीत काल बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने आदरणीय सरन्यायाधीशांचा भव्यदिव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला. ज्या सोहळ्याला भूषणजींच्या मातोश्री, त्यांच्या सौभाग्यवती, कुटुंबातील अन्य सदस्य, देशभरातून आलेले असंख्य वकील, अनेक निवृत्त न्यायाधीश, विद्यमान न्यायाधीश, देशाच्या न्यायिक परिघात वावरणारे अनेक महानुभाव आणि गवई साहेबांचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते… अपवाद होता तो फक्त महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी.. ज्यांच्या बाबत मा. सरन्यायाधीशानी जाहीरपणे खंत व्यक्त केली… पण यावेळी गवई साहेबांच्या आदरणीय मातोश्रींच्या मागच्या रांगेत एक ओळखीचा चेहरा स्क्रिनवर दिसत होता.. उंची जास्त असल्याने ओळखणे शक्य झाले. अर्थात या आसामीची फक्त शारिरीक उ़चीच नाही तर त्यांच्या कर्तृत्वाची पण उंची आहे जी त्यांनी फार मोठ्या कष्टाने मिळवलेली आहे. कायद्याचे किस काढण्याचे सतत काम असल्याने थोडेफार डोक्यावरचे केस गेलेले असले तरी त्यांच्या बुद्धीमत्तेची चमक त्यांच्या चेहऱ्यावर सतत अनुभवायला मिळते… आणि मिञानो हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा सार्थ अभिमान असणारा चेहरा आहे… अर्थातच आमचे परममित्र कोकण सुपूञ अॅड. संग्राम देसाई… होय संग्राम देसाई.
या सोहळ्यात आदरणीय सरन्यायाधीश सत्काराला उत्तर देताना त्यांनी संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाष्य केले त्याबरोबर त्यांनी आपला आतापर्यंतचा सगळा संघर्षमय प्रवास उलगडून दाखवला. मी अगदी तल्लीन होऊन हा सोहळा पहात होतो. ऐकत होतो.. मा. सरन्यायाधीश समारोप करताना म्हणाले, “या महाराष्ट्रातील आणि देशातील न्यायिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या वकील बांधवांना या क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल आणि डिजिटलचा प्रभाव याबाबत सर्वकश ज्ञान मिळावे ज्याचा उपयोग त्यांना आपल्या दैनंदिन वकीली व्यवसायात प्रभावीपणे करता यावा यासाठी संग्राम देसाई हे पनवेलच्या शेजारी भव्यदिव्य अशी वकिलासाठी अकादमी सुरू करण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न करत आहेत. ज्या त्यांच्या अथक प्रयत्नाना यश आले आणि या भव्य संकुलाचे कामही सुरू झाले. संग्राम देसाई यांचे यामध्ये फार मोठे योगदान आहे. या संकुलाचा भूमीपूजन सोहळ्या साक्षिदार होण्याचे भाग्य मला मिळाले आता उदघाटनाचाही साक्षीदार होण्याचे भाग्य मिळेल. ” मा सरन्यायाधीशानी आमच्या या सिंधुदुर्ग सुपूञाचे आपल्या जाहीर सत्कार सोहळ्यात केलेले कौतुक ऐकून त्यांचा एक मित्र म्हणून फार अभिमान वाटला.
क्षेत्र कोणतेही असो, वैद्यकीय, न्यायिक किंवा इतर व्यवसाय साधारणपणे आर्थिक उन्नती आणि स्वत:हाचेच कल्याण हा सरसकट मनुष्य स्वभाव पण संग्राम सारखे त्याला अपवाद असतात. आपण ज्या व्यवसायात आहोत त्या व्यवसायात असणाऱ्या सर्व घटकांसाठी आपण काहितरी रचनात्मक काम केले पाहिजे ही इच्छा आणि जिद्द घेऊन संग्राम काम करत आहेत.
संग्रामचे पिताश्री स्व. डि. डि. देसाई हे पण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करायचे. ते यशस्वी विधीज्ञ होतेच पण ते वाचक होते आणि साहित्यिक अभिरुची असणारे एक उत्तम विश्लेषक होते. माणगाव आंबेरी येथे त्यांनी डि डि. पाॅंईट म्हणून एक जागा विकसित केली होती ज्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात शिवचरित्र, स्वामी विवेकानंदावरची अनेक पुस्तके होती. हिंदूह्यदयसम्राट आदरणीय बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते काही काळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही होते. या अनुषंगाने मला एक गोष्ट आठवते, तेव्हा माझे वय बावीस वर्षे होते. त्यांच्याच वालावलचे जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी मी बसलो होतो. स्व. उषाताई भागवत पण होत्या तेव्हा संग्रामजींच्या पिताश्रींचा सरानां फोन आला. ते म्हणाले, मला तुम्हाला भेटायचे आहे, एका तुम्ही लिहित असलेल्या पुस्तकावर चर्चा करायची आहे. सायंकाळी येवू का ❓त्याप्रमाणे सायंकाळी डि डि. सरांच्या घरी आले. तेव्हा मी पण उपस्थित होतो. त्यांचे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते.. ते भागवत सरांकडे ज्या विषयावर चर्चा करायला आले होते तो विषय म्हणजे तेव्हा भागवत सर “योगी” ही कादंबरी लिहित होते. भागवत सरानां या भेटीचा खूप उपयोग झाला. डि. डि. नी सरांना अनेक संदर्भ दिले.
सांगायचा मुद्दा हा की प्रचंड बुद्धिवान असणाऱ्या डि. डि. च्या सुपूञाने न्यायिक परिवारात आणि परिघात आपला लक्षवेधी स्पेस निर्माण केलेला आहे. म्हणूनच देशाचे सरन्यायाधीश हे आमच्या या वालावलच्या सुपूञाचा कौतुकाने जाहीर उल्लेख करतात. संग्रामजी आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे वालावलच्या माऊलींच्या आशिर्वादाने तुमची ही घौडदौड अशीच होत राहो त्यासाठी मनापासून शुभेच्छा!
We really proud of you Vakilsaheb..
