कोकणात मोठे टॅलेंट, पण दुर्दैवाने “ब्रँडिंग” होत नाही…
ऋषिकेश रावले; महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून शासकीय सेवेत गेलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान…
कुडाळ
कोकणातील लोकांत मोठे टॅलेंट आहे. या ठिकाणी कलाकारासह आयपीएस अधिकारी तसेच अन्य क्षेत्रात लोक यशस्वी झाले आहेत. मात्र दुर्दैवाने त्या यशाचे ब्रँडिंग झाले नाही. मात्र आता या प्रगल्भतेचा वापर करून नवोदित तरुणांनी आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी आज येथे केले. दरम्यान महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देण्याचे काम होत आहे. ही कौतुकाची बाब आहे. हा वारसा असा सुरू राहावा आणि या अकॅडमीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी घडावेत अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या.
महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून विविध शासकीय क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रावले बोलत होते. या प्रसंगी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, ब्रेकींग मालवणीचे ब्युरो चीफ भुवन नाईक, व्हॉइस ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, पत्रकार साईनाथ गावकर, राजेश हेदाळकर, चिन्मय घोगळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. रावले म्हणाले, या ठिकाणी कोकणात आणि विशेषता सिंधुदुर्गात हुशार मुले आहेत. मात्र दहावी-बारावीनंतर ते यश पुढे टिकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आजपर्यंतच्या प्रवासात कोकणात टॅलेंट पाहायला मिळाले. भाऊ कदम, निर्मिती सावंत यासारखे कलाकारांसह अनेक आयपीएस अधिकारी कोकणाने दिले आहेत. मात्र त्यांचे ब्रँडिंग झाले नाही. त्यामुळे नवोदित विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळत नाही. परंतु ही वस्तुस्थिती बद्दल मी गरजेचे आहे. आपल्याच लोकांना आपण संधी देण्यासोबत त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे.
यावेळी युवराज लखमराजे म्हणाले, सावंतवाडी संस्थानाने नेहमीच सकारात्मक काम करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अकॅडमीच्या माध्यमातून सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू ठेवलेला प्रवास आज यशस्वी होत आहे. याचे कौतुक आहे. त्यांच्या या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवून आणि ज्यावेळी आम्ही एखाद्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाऊ त्या ठिकाणी सिंधुदुर्गात घडलेला अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळो, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी श्री. पेडणेकर म्हणाले, येणाऱ्या काही वर्षात शंभरहून अधिक विद्यार्थी अधिकारी घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून महेंद्रा अकॅडमीचा प्रवास सुरू आहे. त्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. आज यशस्वी झालेले विद्यार्थी त्याचाच परिपाक आहे. कठोर परिश्रम आणि अभ्यास केल्यामुळे या विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्या मिळाला त्यामुळे त्यांचा आदर्श अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रात शासकीय नोकरी लागलेल्या पियुषा वारंग, मानसी पांढरे, किरण गोसावी , समीक्षा सोनावडेकर , मंदार राणे आदी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

