“सर्जिकल कवितांच्या पावसात रसिक ओलेचिंब झाले”… ॲड. नकुल पार्सेकर..
कालची संध्याकाळ एका साहित्यिक कार्यक्रमात मस्त एन्जॉय करता आली. अर्थात निमित्त होते जिल्ह्यातील एक यशस्वी सर्जन कवी अमुल पावसकर यांच्या कुडाळ येथे संपन्न झालेल्या ” अनुभूती ” या तब्बल दोनशे कविता अंतर्भूत असलेल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा. कवी अमुल पावसकर यांच्या सौभाग्यवती डॉ. कादंबरी यानी अगत्य पूर्वक पाठवलेले निमंत्रण आणि थोडेफार साहित्य समजणारा एक रसिक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होता आले. नाट्यलेखक केदार सामंत, श्री चंदू शिरसाठ, श्री आनंद वैद्य सर, मरिन इंजिनीअर असलेले माझे मित्र श्री प्रशांत सावळ,शिव व्याख्याते निवेदक व पञकार प्रा. रुपेश पाटील अशी काही मोजकीच मंडळी सोडली तर या प्रकाशन सोहळ्यासाठी डॉ. पावसकर यांच्या वैद्यकीय पेशातीलच त्यांची मिञमंडळी व कुटूंबिय बहुसंख्येने उपस्थित होते.
खरे तर एका सर्जनच्या तब्बल दोनशे कवितांचे रसग्रहण, विश्लेषण अगदी वैद्यकीय भाषेत सांगायचे तर सर्जरी करायची तर कमी वेळेत ती करणे अशक्य. त्यामुळे उस्फूर्त वक्त्यामध्ये माझे नाव असल्याने दोन मिनिटांत शुभेच्छा देऊन थांबणे योग्य म्हणून मी मला जे मांडायचे होते ते मांडू शकलो नाही.
माञ ज्यानी यावर आपली मते मांडली त्याचा आढावा घेणे हाच यामगचा उद्देश. आमचे डॉक्टर मिञ आणि भूलतज्ज्ञ मुक्तानंद गौंडळकर यांनी अतिशय प्रभावीपणे साहित्यिक भाषेत केलेले विश्लेषण ऐकून श्रोते एवढे प्रभावित झाले की, भूल न देताच त्यांनी भूल दिल्याचा भास झाला.
कुडाळ मधील सुमेध पॅथॉलॉजीचे सर्वेसर्वा डॉ. संजय सावंत यांनी डॉ. अमूल पावसकर यांच्या कवितेवर केलेले रसग्रहण ऐकून एरवी रुग्णानां परफेक्ट रिपोर्ट देणारे संजय सावंत साहित्यिक भाषेतही परफेक्ट विश्लेषण करू शकतात हे सिद्ध झाले. या संपूर्ण कार्यक्रमात अगदी यशस्वी आणि सभागृहात हास्यांचे खऱ्या अर्थाने कारंजे कुणी उडवले असतील तर ते म्हणजे डॉक्टर राजेश नवांगुळ. त्यांच्या वैद्यकीय परिवारात त्याना सर्वजण “राजा” संबोधतात. कवी पावसकर यांच्या दोन कवितांची त्यांनी केलेली सर्जरी लाजवाब होती.
उत्कृष्ट निवेदक असलेले आमचे मिञ प्रफुल्ल वालावलकर यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत पावसकरांच्या सामाजिक, राजकीय आणि काही प्रेमकविता़चा अतिशय समर्पक शब्दांत सुंदर आढावा घेतला. राष्ट्रसेवादल व समाजवादी विचारसरणीचे संस्कार असलेले कवी अमुल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेले भाष्य प्रफुल्ल यांनी अधोरेखित केले.
त्वचेच्या रोगाचे निदान करणारे त्वचारोगतज्ञ डॉ. आंबेरकर यांनी डॉ. अमुल पावसकर यांच्या अंगी असलेल्या विविध पैलूचा योग्य शब्दात आढावा घेतला. जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर राणे कुंटुबियासमवेत ज्यांचा सतत वावर असतो ते डॉ. मिलिंद कुलकर्णी. विषय कोणताही असो इतिहासातील अनेक संदर्भ देऊन बोलणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे विचार सतत ऐकत रहावे असे असतात. त्यांच्या व्यक्त होण्यात त्यांनी अतिशय सुंदर सूञ मांडले. ते म्हणाले, ” आज टोकाचे उजवे व टोकाचे डावे यामुळे जातीजातीत, धर्माधर्मात ज्या भिंती उभ्या राहात आहेत हा फारच चिंतेचा विषय असून कुणी कोणत्या विचाराचा आहे यापेक्षा मानवी मुल्य जपणारा विचार आपण सगळ्यानी अंगिकारला पाहिजे. गांधी वधानंतर एका ठराविक समूहाला टारगेट केले जात होती ही माझी भूमिका ठाम झाली होती त्यामुळे गांधी विचाराला मी विरोध करत होतो पण जेव्हा मी गांधी वाचले तेव्हा ही मनातली अढी दूर झाली.. ही साहित्यिकांची आणि साहित्याची ताकद आहे. कुलकर्णी यांच्या या मांडणीमुळे त्यांची दुसरी बाजू या निमित्ताने मला समजली.
कवी पावसकर यांच्या विद्यार्थीनी डॉ. हर्षदा देवधर यांनी ते किती उत्कृष्ट सर्जन आहेत हे अधोरेखित केले. त्यांच्या या कविता संग्रहातील काही कवितांचा अतिशय योग्य शब्दात उहापोह केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थात डॉ. अनिरूध्द फडके. मुंबई महानगरात प्रसिद्ध असलेल्या लीलावती हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. ज्यांचे बालपण मुंबईतील साहित्य सहवास मध्ये गेले. जेष्ठ साहित्यिक विं. दा. करंदीकर यांच्या सारख्या महान साहित्यिकांचा सहवास लाभला त्यांनी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या अनुषंगाने उदाहरण देऊन केलेली मांडणीमुळे श्रोते प्रभावित झाले.
या कार्यक्रमात आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट अनुभवायला मिळाली. कवी पावसकर यांचे मिञ सुप्रसिद्ध स्ञीरोगतज्ञ डॉ. निगुडकर हे बारावी पर्यंत एकमेकांचे वर्गमित्र. अभ्यासातील स्पर्धा असणे साहाजिकच. चांगल्या गुणामुळे मैञी होते पण कधी कधी काही अवगुणांमुळे मैञीत अडसर निर्माण होतो.. तरीही एकाच व्यवसायात असलेल्या या मातब्बर मिञामध्ये एक मैञी पलीकडची मैञी असल्याचे त्यांनी डॉ. पावसकर यांच्यावर केलेल्या दिर्घ कवितेत प्रतिबिंबित झाले. मुक्तछंदात डॉ. निगुडकरानी आपल्या बालपणीच्या मिञावर मुक्तपणे केलेली उधळण दाद देऊन गेली.
साहित्याचे चिंतन असणारे आणि साहित्यिक प्रकारांचा सुक्ष्म अभ्यास असणारे जिल्ह्याच्या नाट्यचळवळीतील एक क्रिएटिव्ह वर्म आणि अभिनेते डॉ. गुरु कुलकर्णी यांनी केलेली मांडणी आमच्या ज्ञानात भर घालणारी होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रभा प्रकाशनचे कवी अजय कांडर यांनी अमोल पावसकर यांनी विविध विषयांवर असंख्य कविता लिहिल्या पण त्यापैकी फक्त दोनशेच कविता निवडणे ही प्रकाशक म्हणून माझी कसोटी होती पण पावसकर सरांच्या सहकार्याने ती जबाबदारी पण आपण पार पाडली. पुढे हत्ती ईलो फेम कवी कांडर म्हणतात, होय व्यवस्थेला प्रश्र्न विचारले पाहिजे. त्यासाठी साहित्यातील कविता हे एक प्रभावी माध्यम आहे. सद्याची नकारात्मक सामाजिक व राजकीय परिस्थिती पहाता सर्वसामान्यांचा आवाज बनून काम करण्याची गरज आहे, यामध्ये साहित्यिक क्षेत्रात वावरणाऱ्यानीही मागे रहाता नये.
प्रकाशनाचा अतिशय सुंदर सोहळा पार पडला.. या सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले ते म्हणजे अतिशय खुसखुशीत व रसरशीत सहज सोप्या भाषेत सु्ञसंचालन करणारे अभिनेते डॉ. संजीव आकेरकर यांनी.
कवी डॉ. अमुल पावसकर यांनी विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या आतापर्यंत चौदाशे कविता लिहिल्या मला वाटते यापुढे त्यानी कादंबरीच्या सहजीवनावर एक सुंदर “कादंबरी” लिहावी आणि ती ते सहजपणे लिहू शकतात कारण तेवढी प्रतिभा आणि शब्दभांडार त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!

