मडुरा पंचक्रोशीत मान्सूनपूर्व पाऊस
बांदा
मडुरा पंचक्रोशीत आज सकाळी एक तास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी मुसळधार कोसळल्या. पावसापासून साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी बळीराजाची तारांबळ उडाली. तर वीजपुरवठा मात्र खंडित झाला होता. मुसळधार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
आज सकाळी मडुरा, पाडलोस, रोणापाल, निगुडे, न्हावेली, दांडेली, आरोस, सातोसे भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे एक तास पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची बरीच तारांबळ उडाली. जनावरांना लागणारे गवत, वर्षभरासाठी लागणारे लाकूड साहित्य, शेतीसाठी लागणारे शेण झाकून ठेवताना शेतकरी पुरता हैराण झाला.
कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी वीज समस्या मात्र अद्यापही कायम आहे. शनिवारी सकाळी मान्सून पूर्व पाऊस कोसळल्याने पारंपरिक पद्धतीनुसार वीजपुरवठा मात्र खंडित झाला होता. वीज गुल होण्याचा हंगाम सुरू झाला असल्याचे संतप्त वीज ग्राहकांनी सांगितले.

