*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ. सुलक्षा मदन देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*पुरस्कार आणि वास्तवता*
*सन्मान ही एक पवित्र संकल्पना आहे. ज्याचं कार्य, कर्तृत्व समाजाला प्रेरणा देतं, त्या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार ही त्या समाजाची ऋणनिर्देश व्यक्त करण्याची एक सभ्य पद्धत असते. पण सध्याच्या काळात हेच पुरस्कार राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक हितसंबंधांचे साधन बनले आहे*.
*एकेकाळी पुरस्कार म्हणजे सर्वोच्च गौरव मानला जात असे. एखाद्या लेखकाचा, कलाकाराचा, शास्त्रज्ञाचा किंवा समाजसेवकाचा कार्यकुशलतेने भरलेला प्रवास जेव्हा समाजापुढे सन्मानित केला जातो, तेव्हा तो सन्मान म्हणजे गुणवत्तेची सार्वजनिक कबुली असते. पण दुर्दैव असे की आजच्या काळात हेच पुरस्कार खिरापतीसारखे वाटले जात आहेत*.
*आज याबाबत जी वास्तविकता आहे, ती खेदजनक आहे. पुरस्कार हा गुणवत्तेवरून मिळतो असं भासविलं जातं, पण प्रत्यक्षात तो ‘कोण कोणाच्या ओळखीचे’, ‘कोणत्या विचारसरणीशी’ जोडलेले, किंवा ‘कोणाची किती आणि कशी चमचेगिरी’ करणारी व्यक्ती आहे, यावरच द्यायचा ठरतो. त्यामुळे अनेकदा ज्यांचं कार्य खरोखरच नावाजण्याजोगं आहे, त्या वक्ती दुर्लक्षित राहतात*.
*साहित्य क्षेत्रात याचा प्रभाव दिसतो*.
*एका विशिष्ट विचारधारा असलेल्या तसंच सुस्थापित लेखकांनाच किंवा या क्षेत्रात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या व्यक्तींनाच गौरवून कमिटीवर बसवणं आणि अशा व्यक्तींसमोर खुशमस्कऱ्या बनून फायद्यासाठी हांजी हांजी करणं यासारख्या गोष्टी पुरस्कार मिळवण्यासाठी ची पहिली पायरी म्हणून वापरल्या जातात आणि ही गोष्ट आता सूर्याप्रकाशाइतकी स्पष्ट झालेली आहे* .
*चित्रपट व मनोरंजन क्षेत्रही यात मागे नाही. इथे तर पुरस्कारांचे व्यावसायिकीकरण झाले आहे. फिल्म फेअरपासून ते राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत, काही ठिकाणी प्रसिद्धी आणि संपर्क, तर काही ठिकाणी राजकीय जवळीक यावरच विजेते ठरतात. यामुळे खऱ्या अर्थाने सर्जनशील, सामाजिकदृष्ट्या जागृत आणि उत्तम कलाकृतींची गळचेपी होते*.
*अनेक शैक्षणिक संस्था, पतपेढी, सामाजिक संस्था, आरोग्य संस्था यासारख्या अनेक ठिकाणी पुरस्कार देणाऱ्यांनाच प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या कामाची थोडीशीही माहिती नसते, ‘फाइलमधल्या शिफारशी’ वरून पुरस्कारप्राप्त व्यक्ती ठरवली जाते* .
*या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की समाजात मूल्याधिष्ठीत गोष्टींवरचा विश्वास कमी होऊ लागला. पुरस्काराचं मूल्य समाजाच्या नजरेत कमी होऊ लागलं. सन्मान हा विकत घेता येतो ही भावना दृढ होऊ लागली आणि पर्यायाने गुणवत्तेचा कसही कमी झाला*.
*योग्य व्यक्तीस, योग्य संस्थेस पुरस्कार देण्याकरता निवडप्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा असणे जरुरीचे आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या कामाची सविस्तर माहिती आणि तिचं मूल्यांकन योग्य रीतीने केलं जाणं गरजेचं आहे. कुठल्याही बिदागीस बळी न पडता आणि कुठलेही हितसबंध न जपता निवड करणं महत्वाचं आहे. तसंच नवोदित आणि अप्रसिद्ध कार्यकर्त्यांचा शोध घेऊन मोठ्या नावांमागे न लागता, घराणेशाहीच्या दबावाला बळी न पडता, ज्या व्यक्ती दूर कुठेही प्रामाणिकपणे कार्य करत आहेत अशा लोकांना पुरस्कारासाठी प्राधान्य दिले गेले पाहिजे*.
*कारण कार्यापेक्षा आता पुरस्कार हा मोठा झाला आहे आणि हे जेव्हा बंद होईल तेव्हाच समाजात गुणवत्ता आणि सामाजिक मूल्ये उंचावली जातील यांत शंका नाही*.
✍🏻©️®️
*सौ. सुलक्षा मदन देशपांडे*
*13/5/2025*

