वीज ग्राहकांच्या समस्यांसंदर्भात उद्या वीज ग्राहक, व्यापारी संघटनेची महावितरणवर धडक…
मालवण
मालवण तालुका वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांच्या अडीअडचणी संदर्भात उद्या दुपारी साडेतीन वाजता येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
कार्यकारी अभियंता कणकवली तसेच महावितरणचे मालवण सहाय्यक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ज्या ग्राहकांना वीज समस्या भेडसावत आहेत त्याबाबत जाब विचारला जाणार आहे. यावेळी वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यावरील चर्चासत्र होणार आहे. यात ग्राहकांच्या समस्या जोपर्यंत सोडविल्या जाणार नाहीत तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही.
सध्या विद्युत खांब, वीज तारा , ट्रांसफार्मरवर जी झाडी, वेली वाढल्या आहेत त्या तोडण्याची कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्या पूर्वीची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. कमी दाबाने शहरात तसेच ग्रामीण भागात होत असलेला वीज पुरवठा, जुनाट, धोकादायक विद्युत खांब बदलण्याची कार्यवाही झालेली नाही. लोंबकळत असलेल्या वीज तारांना गार्डिंग केलेले नाही. काही ट्रांसफार्मरला बॉक्स बसविलेला नाही. काही काही ठिकाणचे इन्सुलेटर खराब झालेले आहेत. ज्याठिकाणी गरज आहे त्याठिकाणी एव्ही स्विच लावलेले नाहीत. ज्यांचे वीज मीटर बंद आहेत त्यांना सरासरी बिल काढून दिले जात आहे. यात काही वीज ग्राहकांना वीज वापरापेक्षा जास्त बिले काढली जात आहेत. काही ग्राहकांना तर वीज बिल भरण्याच्या तारखेनंतर बिले दिली जात आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे, तालुका वीज ग्राहक संघटनेचे, व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारीचा अर्ज तसेच वीज बिलाची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन यावी त्याचबरोबर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

