सिंधुदुर्ग :
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२१ रोजी अनुभव शिक्षा केंद्र आणि We Mean Group तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा, वेंगुर्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची आखणी संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री.सहदेव पाटकर यांनी केली. यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रतील साथी आदित्य कोळापटे, स्वराली साळसकर, संचना सिंघनाथ, आशा राठोड, तन्वी शिंदे, करिश्मा राठोड आणि we mean green या ग्रुप मधील भक्ती घाडी, विशाल गुप्ता, झीनत, पूजा चव्हाण, प्रतीक्षा फोपळे, हुमायरा शागुल, प्रथमेश फडके सहभागी झाले. यावेळी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, वाहून आलेला गाळ असा कितीतरी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सागरेश्वर परिसर व किनाऱ्याचा १ किमी परिसर त्यामुळे स्वच्छ झाला. स्थानिक नागरिकांनीही परिसर सफाई केल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये साहस प्रतिष्ठान वेंगुर्ला येथे भेट देण्यात आली. ही संस्था दिव्यांग मुलांसाठी कार्यरत आहे. या संबंधी साहस प्रतिष्ठान च्या संस्थापिका रुपाली पाटील यांनी माहिती दिली. दीव्यांग मुलांसाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी स्वतःच्या मुलीकडून घेतली.
युवा अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून या पूर्वीही बरेच सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. ही संस्था युवकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करते. व्यक्तिमत्व विकास घडविण्यास हे सर्व उपक्रम मार्गदर्शक ठरतात. वसुंधरा केंद्र नेरूर पार येथे नेतृत्व विकास शिबिर आयोजित करून युवा अनुभव शिक्षा केंद्रातर्फे विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. ही युवा संस्था 3५ वर्षे सामाजिक सेवेत असून या पुढेही जिल्ह्यात समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी युवकांचा चांगला सहभाग मिळत आहे.