*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा लिखित अप्रतिम लेख*
*एक प्रवास आत्मशोधाचा*— “*मी कोण?”*
ज्ञानी मी, गुणी मी
श्रीमंत मी,सुज्ञ मी
वक्ता मी,कवी मी,
बलाढ्य तरी,मी ज्ञाता जगी एक मी
वेदांती पटू मी श्रुती निपुण मी
सर्वज्ञ मी एक मी
मी, मी, मी, समजे परि न समजे
मी कोण , कोठील मी!
मनुष्य जन्माला येतो, तेव्हाच “कोऽहम्?” — मी कोण? असा प्रश्न त्याच्या अंतर्यामी असतो.
मी कोण? मी म्हणजे एक शरीर आहे का?
घरातल्या लोकांनी दिलेलं नाव म्हणजे मी?
कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाच्या तरी नात्याने जोडलेला एक जीव?
पण यापलीकडे माझं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे का?
मी शरीर आहे का?
शरीर तर सतत बदलतं. बालपणीचं शरीर केव्हा गळून पडलं, कळलंच नाही.
एका अर्थी बालपणातलं शरीर “मेलेलं” असतं, पण कोणी रडत नाही.
तारुण्याचं तेज असलेलं एक वेगळंच शरीर केव्हा प्राप्त झालं, समजतही नाही.म्हणजेच, शरीर हे नश्वर आहे.
मी म्हणजे काही विचार आहे का?
तेही सतत बदलतात.
लहानपणी खेळणं तुटलं म्हणून रडणाऱ्या मनाला, आता वेगळ्याच गोष्टींसाठी हळवेपणा वाटतो
प्रश्न तसाच राहतो — मी म्हणजे कोण?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात संपूर्ण जन्म निघून जातो, पण उत्तर सापडत नाही.
मरणानंतर हे शरीर उरत नाही, नातेसंबंध उरत नाहीत, प्रेम-राग, शत्रुत्व उरत नाही.मी तिथे पृथ्वीवर नसलो तरी मी असतोच,! मग मी कोण?
शेवटी जाणवतं —
मी म्हणजे आत्मा!
जो अमर आहे, चैतन्यस्वरूप आहे. आत्मा निर्लेप, बंधनरहित आहे.
शरीर सोडतांना त्याचे सर्व संबंध तुटतात.
आत्मा शरीराच्या मायेत गुंतत नाही. तो अविनाशी आहे, सर्वत्र संचार करू शकतो.
आत्म्याची उन्नती करण्यासाठी त्याने शरीराची मदत घेतलेली असते — एवढंच!
मी कोण? हा प्रश्न स्वतःला सतत विचारत राहिलो, तर आत्मचिंतनातून उत्तर सापडतं.
वेदांत हेच सांगतो — “तत्त्वमसि” — तूच ते ब्रह्म आहेस. अमर आहेस. अविनाशी आहेस.
म्हणून मर्त्य मानवाने आयुष्य समजू लागल्यावर स्वतःचा शोध घ्यावा.
आपल्याला हे जीवन कशासाठी लाभलं आहे, याचा विचार करावा.
राग, लोभ, मोह, माया, संपत्ती — या मोहजालात अडकू नये.
“मट्टी ओढावन, मट्टी बिछावन” —
हे कबीराचं वचन किती सार्थ आहे!
कोणीच आपल्या सोबत येणार नाही.
“जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल” — शरीर सोडल्यावर आपले बोल म्हणजेच आपले वागणे कायम सगळ्यांच्या लक्षात राहणार आहेत
हे लक्षात घेऊनच जगावं.
मी कोण? या प्रश्नाचा पाठलाग अंतर्मनात सुरू असतानाच, अचानक जाणवलं —
खरंच, या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे!
जर मी शरीर नाही, तर मग कोण?
आतून एक आवाज आला —
“तू एक चैतन्य आहेस! निराकार आहे तुझं अस्तित्व! तूच आहेस तो, जो साऱ्या विश्वात व्यापला आहेस!”
सहजच उत्तर सापडलं…
“मी कोण?” या प्रश्नाचं ——
जे कधी नष्ट होणार नाही असं अक्षय टिकणारं अस्तित्व!
अहं ब्रह्मास्मि!
—
प्रतिभा पिटके
अमरावती
मो. ९४२१८२८४१३