You are currently viewing राजन तेलींनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा – कन्हैया पारकर

राजन तेलींनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा – कन्हैया पारकर

कणकवली

शहरात भाजी मार्केटची उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणी तेलींवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा. तसेच तेलींनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज केली.
येथील शिवसेना कार्यालयात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते.
पारकर म्हणाले, भाजी मार्केट साठी आरक्षित असलेल्या ३२ गुंठे जागे पैकी १२ गुंठे जागा आणि १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम ग्लोबल असोसिएटचे राजन तेली हे नगरपंचायतीला करारानुसार देणार आहेत. मात्र भाजी मार्केटचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग आणि उर्वरित तीन मजल्यावर गाळे आणि भाजी विक्रीचे कट्टे बांधण्यात आले आहेत. एका मजल्यावर फक्त ४२ विक्रेत्यांची सोय होणार आहे. शहरात ३०० हून अधिक भाजी, फळ, फुल विक्रेते आहेत. त्यामुळे भाजी मार्केट बांधूनही शहरातील भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर होणार नाही.
पारकर म्हणाले, नगरपंचायतीला १२ गुंठे जागा देण्याच्या मोबदल्यात विकासकाने संपूर्ण ३२ गुंठे जागेचा एफएसआय घेतला आहे. या विकासाकाच्या इमारती दर्शनी भागात आणि रस्त्यालगत आहेत. तर भाजी मार्केट अडगळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता देखील नाही. तसेच ग्राहक पहिल्या मजल्यापर्यंतच भाजी व इतर वस्तू खरेदीसाठी जाऊ शकतात. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर भाजी मार्केट उभारल्याचे उदाहरण आपल्या देशात तरी नाही. त्यामुळे १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम बांधून देत असल्याचा तेली यांचा दावा खोटा आहे.
नगरपंचायत सभेत खुद्द नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीच विकासकांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत. तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा. तसेच नगराध्यक्षांनीही विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला हवे. नगराध्यक्षांनी तसे न केल्यास आम्ही विरोधक प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणार असल्याचे श्री.पारकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा