मी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव या गावचा रहिवासी. माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे हे श्री परसरामजी कासट यांच्याकडे कामाला होते. या कासट परिवारातील कमलताई कासट यांचा विवाह डॉ. मोतीलाल राठी या अमरावती मधील सुप्रसिद्ध डॉक्टरांशी झाला.
डॉक्टर मोतीलाल राठी हे आमच्या साहित्य संगम या साहित्यिक संस्थेचे अध्यक्ष तसेच ते शहरातील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था श्री गणेशदास राठी शिक्षण समितीचेही अध्यक्ष. अमरावतीच्या जडणघडणीत शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मोतीलाल मराठी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सौ कमलताई राठी यांच्याही सहभाग नोंदणीय आहे.
1976 साली आम्ही साहित्य संगम या संस्थेची स्थापना केली. पुढे डॉक्टर मोतीलाल राठी अध्यक्ष झाल्यानंतर आमचे बरेचसे कार्यक्रम डॉक्टर मोतीलाल राठी यांच्या कॅम्प रोडवरील मोठ्या निवासस्थानी असलेल्या सभागृहात व्हायला लागले. डॉक्टर मोतीलाल राठी हे समाजाभिमुख डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असायचा. अर्थातच त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी असायची ती कमलताई यांचे कडे. सुप्रसिद्ध गायक संगीतकार सर्वश्री हृदयनाथ मंगेशकर सुरेश भट मधुकर केचे विठ्ठल वाघ मिर्झा रफी अहमद बेग शंकर बडे नारायण कुलकर्णी कवठेकर जीवन किर्लोस्कर यांचा मुक्काम डॉक्टर साहेबांच्या बंगल्यात राहायचा.
1976 चा काळ असा होता की अमरावती शहरात हॉटेल संस्कृती रुजलेली नव्हती. कवी असो की दुसरा साहित्यिक त्याचा मुक्काम हॉटेलमध्ये नसायचा. तो कोणाच्यातरी घरीच असायचा. डॉक्टर मोतीलाल राठींकडे खालच्या मजल्यावर एक गेस्ट रूम व बॅडमिंटन हॉल व प्रशस्त अंगण असल्यामुळे गावात कोणी पाहुणा आला की त्याचा मुक्काम संयोजक डॉक्टरांच्या परवानगीने डॉक्टरांकडे करायचे. आजच्यासारखी वस्तुनिष्ठ परिस्थिती तेव्हा नव्हती. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रम जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम शाळेत पण मुक्काम मात्र डॉक्टर मोतीलाल राठी यांच्याकडे .
या सर्व साहित्यिकांची काळजी घेणे. त्यांना चहा अल्पोपहार व जेवण देणे ही जबाबदारी कमलताई यांच्या कडे होती. त्यांची मुले प्रवीण व प्रतीक तसेच त्यांचे कंपाउंडर श्री बळवंत राव .भोपळे आणि प्रभाकर व इतर मदतीला असायचे. या सर्वांच्या स्वागतात कमलताईंनी कुठेही कमी पडू दिले नाही .
कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट हे डॉक्टर साहेबांचे मित्र असल्यामुळे त्यांचा मुक्काम एकतर श्री अरविंद ढवळ यांच्याकडे असायचा. नाहीतर डॉक्टर मोतीलाल राठी यांच्याकडे . कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांना सांभाळणे यांची मर्जी राखणे म्हणजे अवघडच काम होते. पण ते अवघड इंद्रधनुष्य मीनाताई अरविंद ढवळे व कमलताई राठी यांनी सांभाळले.
तसंही रोज संध्याकाळी मी अरविंद ढवळे गोविंदभाई राठी अमर अग्रवाल सुखदेव लड्डा डॉक्टर राठींकडे सायंकाळी पाच वाजता एकत्र येत होतो. आमच्या गप्पासप्पा चालायच्या .अर्थातच आम्हाला अल्पोपहार चहा शरबत या कमलताई पुरवायच्या. पण त्यांच्या स्वागतामध्ये व्हेरायटी होती. बाजारात एखादा नवीन पदार्थ आला तर त्याचा स्वाद आम्ही कमलताईंकडेच घेतला. त्यांना स्वागत करण्याची खूप इच्छा होती .त्यामुळे त्यांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाचे मनापासून स्वागतच केले
डॉक्टर मोतीलाल राठी यांचा वाढदिवस आम्ही दर 9 सप्टेंबरला मोठ्या धुमधडाक्यात त्यांच्या बंगल्यावर साजरा करीत होतो. त्या दिवशी तर डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावर तुडुंब गर्दी राहायची. पण या भरीव गर्दीमध्येही त्यांचे सगळ्यांकडे लक्ष असायचे. मदतीला त्यांची मुले प्रवीण प्रतीक आणि इतर सहकारी असायचे. पण या सर्वांवर देखरेख करण्याची जबाबदारी कमलताई सांभाळायच्या. एखाद्याला उपास असू शकतो हे गृहीत धरून त्यांनी अगोदरच उपवासाचे साहित्य बोलवून ठेवलेले असायचे.
डॉक्टर साहेबांची सामाजिक बांधिलकी सांभाळून कमल ताईंनी प्रवीण व प्रतीकला त्यांनी जबाबदारीने मोठे केले. आज दोघेही वैद्यकीय क्षेत्रात मुंबईला नावलौकिकास आहेत. प्रवीण तर वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन पण झाला आहे आणि प्रतीकनेही डॉक्टर साहेबांचा वारसा पुढे चालवला आहे.
1976 चा जो काळ होता तो काळ म्हणजे फॅमिली डॉक्टरचा होता. डॉक्टर घरी जाऊन पेशंटला तपासत होते. डॉक्टर राठी देखील सकाळी आठ वाजता घराबाहेर पडायचे. पेशंटच्या घरी व्हिजिट करायचे साडेदहा वाजता घरी यायचे अल्पोपहार घेऊन अकरा वाजता दवाखान्यात जायचे. उर्वरित काळात येणाऱ्या जाणाऱ्यांना सांभाळण्याचे काम कमलताईंनी पूर्ण केले. त्यामुळे डॉक्टर साहेबाकडे येणाऱ्या पेशंट असो श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचा किंवा तपोवन चा कर्मचारी असो की आमच्या साहित्यिक परिवारातील कोणी असो त्यांनी त्याचे योग्य आदर तिथय केले. त्या काळात डॉक्टर साहेबांकडे तीन कंपाउंडर व एक चालक असे चार कर्मचारी होते पण इतके कर्मचारी असतानाही बेल वाजली की कमलताई स्वतःला जायच्या. हसतमुखाने येणाऱ्याचे स्वागत करायचे.
आपल्यामुळे डॉक्टर साहेबांचा खोळंबा नको म्हणून त्यांनी स्कुटी गाडी घेतली. लहान काम नोकरावर न सोपवता त्या स्वतः करायच्या. डॉक्टर साहेबांचा मोहर बंगला खूप मोठा. या बंगल्याच्या परिसरामध्ये कमल ताईंनी फुलबाग सजवली. अनेक झाडांचे बोन्साय केले. एक वेळ डॉक्टर साहेब दवाखान्यात गेले की कमलताई त्यांच्या फुलबागेमध्ये रमून जायच्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या बागेतील झाडांची काळजी घ्यायच्या.
आज 6 मे कमलताईचा वाढदिवस. काही वर्षांपूर्वी डॉक्टर मोतीलाल राठी यांचे निधन झाले. प्रतिकनी आणि प्रवीण यांना खूप आग्रह केला. तुम्ही आमच्याबरोबर मुंबईला या म्हणून. पण कमल ताईची सारी पाळमूळ अमरावतीला रुतली आहेत.मुंबईसारख्या व्यापारी शहरांमध्ये त्यांना करमणार नव्हते. म्हणून त्यांनी अमरावतीलाच राहण्याचा निर्णय घेतला. इथे असलेल्या नातेवाईकांना मित्रांना इथे असलेल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहता येते .मित्रांच्या संपर्कात राहता येते.डॉक्टर साहेबांचे ऋणानुबंध ज्यांच्याशी आहे त्यांची ये जा सुरू राहते. मदतीला नोकर चाकर आहेतच. आता ताईंनी वयाची 80 वर्ष पार केलेली आहे. येणाऱ्याचे स्वागत त्या आता स्वतः करू शकत नाही. पण प्रसन्न चित्ताने त्याचे स्वागत करून त्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या स्टॉफ वर दिलेली आहे. पण ती जबाबदारी त्यांनी झटकलेली नाही .तर येणाऱ्या प्रत्येकाची आजही त्या काळजी घेतात.
आमचा आणि राठी परिवाराचा ऋणानुबंध गेले 50 वर्ष टिकून आहे. विद्या असो की पल्लवी आम्ही डॉक्टर साहेबांनंतरही आजही या परिवाराचे घटक आहोत आणि राहणार आहोत. आज कमलताई मोतीलाल राठी यांचा वाढदिवस या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा…!
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003